विसर्जन मिरवणुकीत ३३ रुग्णांना ऑक्सिजनद्वारे जीवदान

पुणे : राजगुरूनगरवरून ९२ वर्षांचे वयोवृद्ध पुण्याची विसर्जन मिरवणुक पाहण्यासाठी आले होते. दरम्यान, मोठ्या प्रमाणात असणाऱ्या गर्दीमुळे ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्याने ते बेशुद्ध पडले. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी त्यांना निरंजन सेवाभावी संस्थेच्या मिनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

योग्य वेळी मदत मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले. गणेशोत्सवादरम्यान अशा जवळपास ३३ लोकांना ऑक्सिजनचा पुरवठा करुन मिनी हॉस्पीटलमध्ये उपचार देण्यात आले.तर, संपूर्ण १२ दिवसांच्या उत्सवात जवळपास ३ हजार ८०० हून अधिक गणेशभक्त आणि पोलिसांची तपासणी करीत त्यांना आरोग्य सेवा देण्याकरीता हे मिनी हॉस्पिटल सज्ज होते.

विश्रामबाग फरासखाना पोलीस स्टेशनच्या आवारात उभारण्यात आलेल्या मिनी हॉस्पिटलमध्ये २० डॉक्टरांसह सुसज्ज रुग्णवाहिका नागरिकांच्या सेवेकरीता उपलब्ध होती. डॉ. अभिनव माहेश्वरी, डॉ. शैलेंद्र शुक्ला, डॉ. दिव्यामाला पाटील, डॉ. मनीषा दणाने, डॉ. अनंत बागुल, डॉ.आनंद बलदोटा डॉ. स्मिता भोयर, यासोबतच निरंजन सेवा संस्थेचे जयेश कासट, ब्रह्मानंद लाहोटी, अजय झंवर, आनंद भट्टड, जगदीश मुंदडा, स्वप्नील देवळे यांनी मिनी हॉस्पिटलमध्ये सेवा दिली आहे. तसेच निरंजन सेवाभावी संस्थेचे सर्व कार्यकर्ते तत्परतेने कार्यरत होते. महेश नागरी सहकारी बँक व युनिव्हर्सल हॉस्पिटलचे या उपक्रमाला विशेष सहकार्य लाभले.