काही लोकांकडे नवीन नोटांचे घबाड कसे- सुप्रीम कोर्ट

केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर दोन टोकाचे परिणाम दिसत आहे. काही लोकांना चलनतुटवड्याचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे काही लोकांवर या निर्णयाचा काहीच परिणाम दिसत नाही असे निरीक्षण सुप्रीम कोर्टाने नोंदवले आहे. काही लोकांकडे लाखो रुपयांच्या नवीन नोटांचे बंडल कसे आढळत आहे असा सवालच सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला विचारला.

नोटाबंदीप्रकरणी गुरुवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने नोटाबंदीच्या याचिकेवर आपला निकाल राखून ठेवला आहे. पण सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने सरकारला फटकारले आहे.  लोकांना अजूनही प्रत्येक आठवड्याला २४ हजार रुपये काढता येत नाही. मग काही लोकांकडे लाखो रुपयांच्या नोटा कशा आढळतात असा सवालच सरन्यायाधीश टी एस ठाकूर यांनी केंद्र सरकारला विचारला. यावर अॅटर्नी जनरल मुकूल रोहतगी म्हणाले, काही बँकांमधील मॅनेजर बेकायदेशीरकृत्यांमध्ये सहभागी आहेत आणि सरकार अशा मंडळींवर कारवाई करत असल्याचे अॅटर्नी जनरल यांनी कोर्टासमोर स्पष्ट केले. देशभरात आयकर विभागाची कारवाई सुरु असून यादरम्यान कोट्यावधी रुपयांच्या नवीन नोटांचे बंडल जप्त केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाने सरकारला हा प्रश्न विचारला आहे.

दरम्यान, ९ डिसेंबररोजी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने नऊ प्रश्न उपस्थित केले होते.  नोटाबंदीच्या निर्णयामागचा उद्देश आणि फायदा काय, हा निर्णय घेताना गोपनियता बाळगण्यात आली होती का असे प्रश्न कोर्टाने उपस्थित केले होते. तर केंद्र सरकारने  नोटाबंदीच्या समस्येवर १० ते १५ दिवसांत तोडगा निघेल अशी माहिती सुप्रीम कोर्टात दिली होती. आम्ही नोटाबंदीच्या समस्येवर शांत बसलेलो नाही असे सरकारने कोर्टात सांगितले होते.