नाना पटोले यांच्यावर नाराजी, सचिन सावंतांचा काँग्रेस प्रवक्तेपदाचा तडकाफडकी राजीनामा

नाना पटोले यांच्यावर नाराजी, सचिन सावंतांचा काँग्रेस प्रवक्तेपदाचा तडकाफडकी राजीनामा

blank

मुंबई : पत्रकार परिषद, सोशल मीडिया व वृत्तवाहिन्यांवरील पॅनल चर्चेच्या माध्यमांतून गेल्या दहा वर्षांपासून काँग्रेस पक्षाची भूमिका जोरकसपणे मांडणारे व विरोधकांचे हल्ले परतावून लावणारे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राज्य काँग्रेसच्या मुख्य प्रवक्तेपदी अतुल लोंढे यांची नियुक्ती केल्याने सावंत यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

सचिन सावंत हे गेल्या दहा वर्षांपासून जास्त काळ प्रवक्ते होते. तरीही त्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या ट्विटर पेजवरूनही त्यांनी प्रवक्ता असल्याचं हटवलं आहे. सचिन सावंत हे नाना पटोले यांच्यावर नाराज असल्याचीही चर्चा आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य पातळीवरील पक्ष संघटनेत मोठे बदल केले आहेत. त्यांनी सावंत यांना डावलून पक्षाचे मुख्य प्रवक्तेपद तयार करून अतुल लोंढे यांच्याकडे जबाबदारी दिली आहे. या नाराजीतून सावंत यांनी थेट हायकमांडला पत्र लिहून जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली आहे.

आज जाहीर झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्ये नाना पटोले यांच्या समर्थकांचीच सर्वाधिक वर्णी लागली आहे. अतुल लोंढे हे पटोले समर्थक असल्यानेच त्यांची मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती झाल्याचं सांगण्यात येत आहे. नियुक्त्यांमध्ये सावंत यांना डावलून अतूल लोंढे यांना मुख्य प्रवक्तेपद देण्यात आलं. त्यामुळे सावंत नाराज झाले असून या नाराजीतूनच त्यांनी प्रवक्तेपदाचा राजीनामा दिल्याचं सूत्रांनी सांगितले.

नाना पटोले यांची नियुक्ती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी झाल्यानंतर काँग्रेसने महाराष्ट्रात आक्रमक भूमिका घेण्यास सुरूवात केली आहे. नाना पटोले यांनी स्वबळावर सत्तेत येण्याचंही भाष्य अनेकदा केलं आहे. अशात त्यांनी आज आपली टीम जाहीर केली त्यात सचिन सावंत यांचं नाव नव्हतं. त्यामुळेच सचिन सावंत यांनी नाराज होऊन आपलं पद सोडल्याची चर्चा आहे.

महत्वाच्या बातम्या