न्यायालयाबाहेरही “नो पार्किंग” झोन

पुणे – न्यायव्यवस्थेचा महत्त्वपूर्ण घटक म्हणजे पक्षकार. न्यायालयीन कामकाजासाठी हजारो पक्षकार शिवाजीनगर न्यायालयात येत असतात. मात्र, पक्षकारांच्या वाहनांना न्यायालयात प्रवेशच नाही. ते न्यायालयाच्या बाहेर वाहने लावायची.

मात्र, आता न्यायालयाच्या बाहेरही त्यांना वाहने लावण्यास मज्जाव करण्यात आला आहे. हा परिसरत वाहतूक शाखेने नुकताच “नो पार्किंग’ झोन जाहीर केला आहे. त्यामुळे पक्षकारांनी वाहने लावायची तर कुठे, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.शिवाजीनगर न्यायालयात दररोज 8 ते 10 हजार पक्षकार ये-जा करत असतात. येथे प्रॅक्‍टिस करणाऱ्या वकिलांची, त्यांच्याकडे असलेल्या वाहनांची संख्याही मोठी आहे. या वाहनाच्या संख्येचा आणि उपलब्ध जागेचा विचार करून शिवाजीनगर न्यायालयात पक्षकारांना पार्किंग करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

न्यायालयात ते गाडी घेऊनही जावू शकत नाहीत. न्यायालयाच्या आवारात केवळ वकील, न्यायाधीश आणि कर्मचाऱ्यांना पार्किंग करता येते. पक्षकार आतापर्यंत शिवाजीनगर न्यायालयाच्या बाहेरील चार क्रमांकाच्या प्रवेशद्वाराबाहेर रस्त्यावर गाड्या पार्किंग करत असत. आता तेथेही गाड्या पार्क करणे त्यांना शक्‍य होणार नाही. कारण तो “नो पार्किंग’ झोन असल्याचे फलक वाहतूक शाखेच्या वतीने लावण्यात आले आहेत.