मुंबई : विधानपरिषदेनंतर गेले तीन दिवस राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. शिवसेनेतील अंतर्गत मतभेदामुळे महाराष्ट्राचं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे. मात्र या सर्व घडामोडी घडत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आतापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र आज माध्यमांसमोर येत अजित पवारांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले कि, राज्याचे मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना आमचा खंबीर पाठिंबा आहे. शेवटपर्यंत संघर्ष करत राहू, असं ते म्हणालेत. तसेच पुढे आम्ही सरकार टिकण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. मी दुपारी मुख्यमंत्र्यांशी बोललो. आताही बोललो. यापेक्षा दुसरी कोणतीही भूमिका राष्ट्रवादीची नाही. ही आमची अधिकृत भूमिका असेल. प्रसारमाध्यमांनी इतर कोणत्याही वृत्तवर विश्वास ठेवू नये. शिवसेनेबाबत जे काही निर्माण झालं आहे ते त्यांचे प्रवक्ते सांगतील, असं अजित पवार म्हणालेत.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. काही झाले तरी शेवटपर्यंत महाविकास आघाडीचे सरकार टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचं जयंत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. शरद पवार यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली. बैठक संपल्या नंतर जयंत पाटील यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली. त्याबरोबरच मुख्यमंत्री वर्षा सोडून मातोश्रीवर गेले आहेत हा त्यांचा व्यक्तिगत निर्णय असल्याचे जयंत पाटील म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :