शेतकऱ्यांच्या भारत बंदला आमचा मनापासून पाठींबा- संजय राऊत

शेतकऱ्यांच्या भारत बंदला आमचा मनापासून पाठींबा- संजय राऊत

bharat band

मुंबई : शेतकरीविरोधी तीन काळे कृषी कायदे व वीज क्षेत्राचे खासगीकरण विधेयक रद्द करावे. इंधनाचे दर कमी करून त्या जीएसटीच्या कक्षेत आणावे. स्वामीनाथन समितीच्या शिफारसीनुसार सर्व शेतीमालाला आधारभूत किमती व सरकारी खरेदीची हमी देणारा कायदा करावा, यासह अन्य प्रमुख मागण्यांसाठी आज संयुक्त किसान कामगार मोर्चाच्या वतीने भारत बंदची घोषणा केली आहे.

दरम्यान शेतकऱ्यांच्या या भारत बंदला शिवसेनेने पाठिंबा दर्शवला आहे. गेल्या वर्षभरापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. हा शेतकऱ्यांचा बंद आहे. देशातील प्रत्येक नागरिकाची भावना शेतकऱ्यांसोबत आहे. उद्योगधंदे तर अगोदरपासूनच बंद आहेत. बेरोजगारीमुळे लोक असेही घरातच बसलेले आहेत. त्यामुळे बंद तर सुरू आहेत त्यात शेतकऱ्यांनीही बंद पुकारलाय. आम्ही मनापासून त्यांच्यासोबत आहोत, या शब्दांत संजय राऊत यांनी शेतकऱ्यांच्या बंदला पाठिंबा दर्शवला आहे.

दरम्यान या भारत बंदला देशातील अनेक राजकीय पक्षांनी पाठींबा दिला आहे. यामध्ये अनेक शेतकरी संघटना,कामगार संघटना, राजकीय पक्ष, राज्य सरकार आणि संघटनांनी पाठिंबा दिला आहे. राज्य सरकारांमध्ये तामिळनाडू, छत्तीसगड, केरळ, पंजाब, झारखंड आणि आंध्रप्रदेश सरकारांनी भारत बंदला पाठींबा दिला आहे.

तर, राजकीय पक्षांमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्ष, अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉक, क्रांतिकारी समाजवादी पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, आम आदमी पक्ष , समाजवादी पार्टी, तेलुगु देसम पार्टी, जनता दल, बहुजन समाज पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, द्रविड मुन्नेत्र कळघम, झारखंड मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय जनता दल, स्वराज इंडिया, शिवसेना आणि इतर अनेक पक्षांनी भारत बंदला पूर्ण पाठिंबा दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या