fbpx

‘पंकजाताई मुंडे या माझ्या मित्राच्या कन्या , बोलावं तर अडचण, अशी आमची अवस्था’

टीम महाराष्ट्र देशा : ग्रामविकासमंत्री म्हणून कारभार पाहणाऱ्या पंकजाताई मुंडे या माझ्या मित्राच्या कन्या आहेत. त्यांनी चोंडी प्रकल्पासाठी दोन कोटींचा निधी दिला खरा, पण तो निधी कुठे गेला हे कळलेच नाही, असे सांगत बोलावं तर अडचण, अशी आमची अवस्था झाली आहे, असा टोला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री अण्णा डांगे यांनी हाणला.

पवार घराण्याच्या चौथ्या पिढीतील राजकीय नेते रोहित दादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत चोंडी येथे कर्जत – जामखेड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी माजी मंत्री अण्णा डांगे यांनी आगामी निवडणूकांच्या दृष्टीने कार्यकर्त्यांचा क्लास घेत निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक आयुधांचे धडे दिले. या क्लासनंतर त्यांनी आजवरच्या राजकीय प्रवासातील काही आठवणींना उजाळा दिला.

आगामी निवडणूकांमध्ये सत्ताधारी व विरोधक यांचा मोठा कस लागणार. म्हणूनच राष्ट्रवादीने आगामी निवडणूकांसाठी जबरदस्त प्लॅनिंग केलं पाहिजे. चांगली योजना असेल तर मोठे यश निश्चित मिळते. पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला गावाची नाडी ओळखता आली पाहिजे. जनतेशी सततचा संपर्क महत्वाचा आहे. गावागावात संघटनात्मक बांधणी होणे आवश्यक आहे. आगामी निवडणुका अटीतटीच्या होणार असल्याने सर्व ताकदीनिशी मैदानात उतरावे लागेल, असा वडिलकीचा सल्ला डांगे यांनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेस माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली म्हणूनच चोंडी विकास प्रकल्प उभा आहे, असे प्रतिपादनही त्यांनी केले.