महाराष्ट्रात युतीला २४० जागा मिळतील, आठवलेंनी केली ‘एवढ्या’ जागांची मागणी

athawale-ramdas-

टीम महाराष्ट देशा : राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सध्या जोरदार सुरु आहे. सर्वच राजकीय पक्ष सध्या वेगवेगळ्या पद्धतीने प्रचार करत आहेत. युतीचे जागावाटप अजून झालेले नाही त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. अशातच आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी भाजप आणि शिवसेनेकडे १० जागांची मागणी केली आहे.

रामदास आठवले यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना आम्ही विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा, शिवसेनेच्या युतीसोबत आहोत. युतीला २८८ पैकी २४० जागा मिळतील. यामुळे आम्हाला १० जागा हव्या असल्याची मागणी मांडलेली आहे असं विधान केले आहे. त्यामुळे जागावाटप जाहीर झाल्यानंतर मित्रपक्षांना नक्की किती जागा मिळणार आणि त्यात आरपीआय किती जागा लढवणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, अद्याप युतीचे जागावाटप जाहीर न झाल्याने यावेळीही २०१४ ची पुनरावृत्ती होऊ शकते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती तुटली होती. जागावाटपाबाबत एकमत न झाल्याने दोनही पक्षांनी वेगवेगळी निवडणूक लढवली होती. त्यामुळे आताही युती नाही झाली तर दोनही पक्ष वेगवेगळे लढू शकतात.

दरम्यान, शिवसेनेचे नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी युतीविषयी बोलताना ‘शिवसेना-भाजपच्या युतीमध्ये तिढा निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून बाहेर चर्चा सुरु आहेत. त्यावर युतीबाबत नेमकं ठरलं आहे. बाहेर कोण काय बोलत आहेत हे मला माहित नाही. शिवसेना-भाजपमध्ये जे इनकमिंग सुरु आहे, त्यावर आम्ही योग्य उमेदवार पारखून घेत आहोत. युतीत शिवसेना विश्वासघात करणार नाही असं विधान केले आहे.