…अन्यथा सोमवारपासून आंदोलन करणार ; एमपीएससीचे विद्यार्थी आक्रमक

mpsc

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणारा विद्यार्थी स्वप्नील लोणकर याने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली. राज्याच्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा चांगलाच गाजला. यावरून विरोधकांनी रान पेटवले होते. भारतीय जनता पक्षाने एमपीएससीच्या रखडलेल्या प्रक्रियेवरून महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरले होते.

यावर विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ५ जुलै रोजी विधानसभेत एमपीएससीची सर्व रिक्त पदे ३१ जुलै २०२१ पर्यंत भरण्याची घोषणा केली. ते म्हणाले, मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सर्व सहकाऱ्यांशी चर्चा करून यासंदर्भात चर्चा केल्याचे पवार यांनी विधिमंडळात सांगितले.

परंतू आता ३१ जुलै तारीख उलटल्यानंतरही राज्य सरकारने एमपीएससीची रिक्त पदे भरण्याबाबत कोणतीही कारवाई केली नसल्याने आता एमपीएससीचे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. अजित पवार यांनी 31 जुलैपर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यांच्या नियुक्त्या केल्या जातील, असं आश्वासन दिलं होतं. मात्र, या नियुक्त्या अद्याप झाल्या नाहीत. तसेच संयुक्त पूर्व परीक्षेच्या तारखा देखील जाहीर करण्यात आल्या नाहीत. यामुळे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. सरकारने दिलेलं आश्वासन लवकरात लवकर पूर्ण करावं अन्यथा सोमवारपासून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या