…अन्यथा त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचा इशारा

raosaheb vs uddhav

नवी दिल्ली : राज्यात आरक्षणाचा वाद पुन्हा चिघळत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा समाजातर्फे राज्यभर आंदोलनं होत असतानाच काल कोल्हापूरमध्ये झालेल्या गोलमेज परिषदेतून ‘थोबाड फोडो आंदोलन’ आणि महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणावर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. “मराठा समाजाला आमच्या सरकारने आरक्षण दिलं. आम्ही कुठल्याही समाजाचं आरक्षण कमी करुन मराठा समाजाला आरक्षण दिलेलं नाही. ओबीसी, एसटी, एससी अशा कोणत्याही समाजाचं आरक्षण कमी केलं नाही. कोणत्याही समाजावर अन्याय न करता हे आरक्षण दिलेलं होतं”, अशी प्रतिक्रिया दानवेंनी आज टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी संवाद साधताना दिली आहे.

“आता हे सरकार कोणत्याही सामाजाचं आरक्षण कमी करुन मराठा समाजाला आरक्षण देणार असेल तर त्याचे काय परिणाम होतील याचा सरकारने विचार केला पाहिजे”, असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे. तसेच “ओबीसी समाजाने मराठा समाजाला आरक्षणासाठी जागा द्यावी, ही आमच्या पक्षाची भूमिका नाही. कोणत्याही आरक्षणाला धक्का न देता आमच्या सरकारने आरक्षण दिलं होतं. तेच आरक्षण राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात टिकवलं पाहिजे”, अशी भूमिका दानवेंनी स्पष्ट केली आहे.

तर, “मराठा आरक्षणाची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारची आहे. आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारने पूर्ण प्रयत्न केले तरच राज्यातील मराठा समाज शांत होईल. अन्यथा त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील”, असा इशारा देखील रावसाहेब दानवे यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या :