…अन्यथा लोकांचा ‘ठाकरे’ नावावरील विश्वास उडेल : बाळा नांदगावकर

uddhav thakrey

मुंबई : परतीच्या पावसाने पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह अनेक जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे दक्षिण भारतासह महाराष्ट्रात पावसाचा मुक्काम लांबला आहे. येत्या १७ तारखेपर्यंत हवामान खात्याने रेड अलर्ट जारी करत सतर्कतेचा इशारा दिला असून १० ऑक्टोबरपासून अचानकपणे पाऊस सक्रिय झाल्याने शेतकऱ्यांचं मात्र प्रचंड नुकसान झालं आहे.

हाताशी आलेला ऊस, सोयाबीन, भात आणि इतर पिक काही ठिकाणी आडवं झालं आहे तर अनेक शेतकऱ्यांचं पिकचं वाहून गेलं आहे. त्यामुळे आधीच कीड, ४ महिन्यातील अतिवृष्टी, कोरोनामुळे बिघडलेलं आर्थिक चक्र, बोगस बियाणं यासारख्या प्रतिकूल परिस्थितींशी सामना करणाऱ्या मायबाप शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी दाटलं असून भविष्याची मोठी चिंता निर्माण झाली आहे. याकडे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मुख्यमंत्र्यांनी घराबाहेर पडून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊनच धीर दिला पाहिजे असा सल्ला दिला आहे.

“मुख्यमंत्रीजी घर सोडा आणि बाहेर पडा, आम्ही तुमच्यावर थेट टीका करण्याचे टाळत आलो पण आता शेतकऱ्यांचे अतिवृष्टी मुळे झालेले हाल ‘online’ बघता येणार नाही, थेट बांधावर जाऊन ते अश्रू पुसा व त्यांना त्वरित आर्थिक मदत दया, अन्यथा लोकांचा ‘ठाकरे’ नावावरील विश्वास उडेल” असं ट्विट बाळा नांदगावकर यांनी केलं आहे.

दरम्यान, अतिवृष्टी, वादळी पावसामुळे पिकांचे नुकसान याबाबत तसेच घरांची पडझड, मालमत्तांचे नुकसान यांचेही तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. सर्वच परिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल सकाळपासूनच आढावा घेणे सुरु केले. मुख्य सचिव, राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष तसेच गृह विभागाकडून परिस्थितीचा आढावा घेतानाच, त्यांना नागरिकांच्या मदतीसाठी आणि समन्वय आणि नियंत्रणावर लक्ष केंद्रीत करण्याचे निर्देश दिले आहेत.

महत्वाच्या बातम्या:-