…अन्यथा मी राजीनामा देईन; विजय वडेट्टीवारांचे मोठे विधान

wadettiwar

मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून निवडणुका पुढे ढकलता येणार नाहीत तसेच कोरोनाचे निर्बंध पोटनिवडणुकीसाठी लागू होत नसल्याचा सर्वोच्च न्यायालयाने निर्वाळा दिला होता. यानंतर राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम व नागपूर जिल्हा परिषदा व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या तारखा सोमवारी जाहीर केल्या. त्यानुसार ५ ऑक्टोबरला मतदान होईल तर लगेच दुसऱ्या दिवशी ६ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.

यावर भाष्य करताना काँग्रेस नेते तथा राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मोठे विधान केले आहे. ‘आजच्या या परिस्थितीला भाजपा जबाबदार आहे, महाविकास आघाडी किंवा काँग्रेस नाही असा आरोपही त्यांनी केला आहे. त्याचबरोबर माझ्या राजीनाम्याने जर हा प्रश्न सुटणार असेल तर मी राजीनामा द्यायला तयार आहे.’ असे विधान त्यांनी केले आहे.

तसेच ओबीसी आरक्षणाशिवाय या निवडणुका होणार आहेत. पोटनिवडणुकांच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय चर्चेतून तोडगा काढण्याचा प्रयत्न आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच्यांशी चर्चा करणार असल्याचेही ते म्हणाले. ‘सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.

यापूर्वी कोरोनाच्या संकटामुळे या निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती आम्ही निवडणूक आयोगाला केली होती. आम्ही सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचीही विनंती केली आहे. सर्वपक्षीय चर्चेनंतर जो काही निर्णय होईल तो निर्णय घेतला जाईल. जर चर्चेतून योग्य तो तोडगा निघू शकला नाही तर मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे निवडणुकांना सामोरे जाऊ’ असेही वडेट्टीवार यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या