fbpx

…अन्यथा संघर्ष अटळ आहे, नितेश राणेंचा सरकारला गर्भित इशारा

मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने यंदा पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश घेणाऱ्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना मराठा आरक्षण नाही असा निर्णय दिला होता. त्यांनतर राज्यसरकारने सुप्रीम कोर्टात वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमात मराठा आरक्षणासंदर्भात याचिका दाखल केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारची याचिका फेटाळली. त्यामुळे मराठा विद्यार्थी चांगलेच संतापले आहेत.

आता याच मुद्द्यावरून राजकारण व्हायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र सरकारने वैद्यकीय शाखेच्या मराठा मुलांच्या भविष्यासाठी अध्यादेश काढावा आणि मराठा समाजाला दिलेला शब्द पाळावा. नाहीतर संघर्ष अटळ आहे, असं आमदार नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

मतांच्या मोहापायी सरकारने विद्यार्थ्यांचाही बळी दिला असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. भाजपकडे कोणत्याच गोष्टीचा लाँग टर्म प्लान नसतो. मग त्यांच्या फसलेल्या योजना असोत किंवा नुकतेच जाहीर झालेले मराठा आरक्षण. निवडणुकांच्या अनुषंगाने आरक्षण जाहीर केले मात्र त्याची ठोस अंमलबजावणी सरकारला करता आली नाही. मेडिकलच्या विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाला सरकारच जबाबदार असल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे.