‘नाहीतर अलीगढच्या कुलुपविक्रेत्याला पैसे परत मिळालेच नसते’, काँग्रेसकडून मोदींच्या ‘त्या’ आठवणीची खिल्ली

narendra modi

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. अलीगढ येथे मोदी यांनी राजा महेंद्र प्रताप सिंह राज्य विद्यापीठाच्या कोनशीलाचे अनावरण केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मोदी यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींनी उजाळा देताना त्यांच्या बालपणीचा एक किस्सा सांगितला होता. एक मुस्लिम कुलूप विक्रेता विश्वासाने वडिलांकडे पैसे ठेवायचा असे म्हणत मोदींनी अलीगढशी आपले जुने नाते असल्याचे सांगितले.

या आठवणीवरून काँग्रेसने मोदी यांची अप्रत्यक्षपणे खिल्ली उडवली आहे. काँग्रेस नेते तथा राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी एक उपहासात्मक ट्विट केले आहे. यात त्यांनी कोणाचेही नाव घेतले नाहीये. परंतू त्यांचा रोख कोणाकडे आहे हे दिसून येते.

 

ट्विटमध्ये राऊत म्हणतात की, ‘तो कलुपं विकणारा अलिगढचा सेल्समन जे पैसे यांच्या वडिलांकडे विश्वासाने ठेवून जायचा, ते पैसे यांचे वडील कुलूप लावून ठेवून देत असणार. नाहीतर चार दिवसांनी ते त्याला परत मिळाले नसते.’

सध्या काँग्रेसकडून मोदी सरकारवर देशातील महत्त्वपूर्ण संस्था विक्री होत असल्याचा आरोप होत आहे. खासगीकरणाच्या नावाखाली मोदी मोठमोठे प्रकल्प मित्रांच्या फायद्यासाठी विक्री करत असल्याची टीका काँग्रेसकडून सातत्याने होत आहे. त्याच अनुषंगाने नितीन राऊत यांनी हे ट्विट केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी?
अलीगढ येथे मोदी यांनी राजा महेंद्र प्रताप सिंह राज्य विद्यापीठाच्या कोनशीलाचे अनावरण केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मोदी यांनी एक आठवण सांगितली. ते म्हणाले, ‘एक मुस्लिम व्यक्ती होती. जे दरवर्षी तीन महिन्यांसाठी आपल्या गावी येत होते. कुलुप विक्री करण्यासाठी ते आमच्याकडे यायचे. माझ्या वडिलांसोबत त्यांची चांगली मैत्री झाली. दिवसभरात जी काही कमाई व्हायची ती वडिलांकडे द्यायचे. अलीगढला परत जाता ते वडिलांकडून पैसे घ्यायचे’.

बालपणीपासून उत्तर प्रदेशातील दोन शहरांची ओळख आहे. डोळ्याला काही इजा झाली, आजार असेल तर सीतापूरला जायची चर्चा व्हायची. याशिवाय वडिलांचा मित्र असलेल्या मुस्लिम व्यक्तीमुळे अलीगढचं नाव कानावर पडत असत. हल्ली कुलपांशिवाय शस्त्रांसाठीही अलीगढला ओळखू. कुलपांमुळे घराचे संरक्षण होते तर शस्त्रांनी देशाच्या सीमेचं संरक्षण होईल अशा भावना मोदींनी यावेळी व्यक्त केल्या.

महत्त्वाच्या बातम्या