fbpx

उस्मानाबाद लोकसभेची जागा शिवसेनेकडेच- सूत्र

टीम महाराष्ट्र देशा – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भाजप – शिवसेनेच्या युतीवर शिक्कामोर्तब झाले आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली आहे. युती संदर्भात शहा आणि ठाकरे यांच्यामध्ये बैठक पार पडली. त्यानंतर मागील चार वर्षापासून दोन्ही पक्षात सुरु असणारी तूतु मै मै थांबली आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबतची स्वतः घोषणा केली.

उस्मानाबाद लोकसभेची जागा युतीच्या जागावाटपात शिवसेनेकडेच असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघावर भाजपकडून जो काही दावा सांगितला जात होता तो आता पोकळ ठरलेला दिसत आहे.

भाजपच्या अनेक नेत्यांनी उस्मानाबाद लोकसभेची जागा भाजपला सुटण्याचा घात घातला होता. अनेकांनी तर निवडणुकीची तयारी देखील चालू केली होती. परंतु युतीच्या जागावाटपात उस्मानाबाद लोकसभेची जागा आता शिवसेनेकडेच असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला आहे.

उस्मानाबाद लोकसभेला जिल्ह्यात राष्ट्रवादी-काँग्रेस, शिवसेने सोबतच काँग्रेसचीही मोठी ताकद जिल्ह्यात आहे. त्यासोबतच भाजपनेही जिल्ह्यात चांगला जम बसविला आहे. त्यामुळे प्रत्येक जण युती किंवा आघाडी झाली तरी आपल्याच पक्षाला जागा कशी सुटेल आणि आपल्यालाच तिकीट कसे मिळेल, यासाठी इच्छुकांनी तगडी फिल्डींग लावली होती.

सध्यातरी राष्ट्रवादीकडून अर्चना पाटील किंवा त्यांच्या कुटुंबातील उमेदवार आणि शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्यातच लोकसभेचा सामना रंगणार असल्याचे चित्र आहे.