उस्मानाबाद लोकसभेसाठी राष्ट्रवादी-काँग्रेसकडून अर्चनाताई पाटील?

निलंगा: (प्रा.प्रदीप मुरमे)
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी-काँग्रेस आणि कॉंग्रेस आघाडीकडून पक्षाचे जेष्ठ नेते डॉ.पद्मसिंह पाटील यांच्या स्नूषा तथा जि.प.उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
आगामी लोकसभा निवडणूकीच्या उमेदवारीवरुन राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षात मागील काही दिवसापासून जोरदार खल चालू आहे. डॉ.पद्मसिंह पाटील हे आगामी निवडणूक लढविणार नसल्याने माजी मंञी दिलीप सोपल, माजी मंञी राणादादा पाटील, आ.सतिश चव्हाण, आ.विक्रम काळे, सौ.सुनेञाताई पवार, सौ.अर्चनाताई पाटील यांची नावे मागील काही दिवसापासून चर्चेत आहेत. या पार्श्वभूमीवर आगामी लोकसभेच्या उमेदवारीची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत आघाडीत कमालीचे औत्सुक्य लागून राहिले आहे. दरम्यान नुकत्याच हाती आलेल्या विश्वसनीय सूत्राच्या माहितीनुसार सौ.अर्चनाताई पाटील यांचे नाव सध्या चर्चेत आघाडीवर असून पक्षश्रेष्ठीने सौ.पाटील यांची उमेदवारी फायनल केली असल्याचे समजते आहे .

याबाबत प्रतिनिधीने थेट सौ.अर्चनाताई पाटील यांच्याशी ‘भ्रमनध्वनी’वरुन संपर्क साधला असता भूम दौ-यावर असलेल्या सौ .पाटील यांनी अद्याप उमेदवारीचा निर्णय फायनल झाला नसून उमेदवारीबाबत पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर चाचपणी सुरु असल्याचे सांगितले. पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा उमेदवारीचा निर्णय अंतिम राहणार असून पवार साहेब जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हा कार्यकर्त्यांसाठी प्रमाण राहिल.

त्याचबरोबर उमेदवारी फायनल झाली का? या चर्चेबाबत त्यांना विचारले असता, अजून कोणाचीही उमेदवारी फायनल झाली नसल्याचे सांगून पक्षश्रेष्ठी याबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. आपण पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली असून आपले नाव चर्चेत आघाडीवर असल्याच्या वृत्ताला सौ.पाटील यांनी दुजोरा दिला आहे. परंतु त्याच बरोबर आपल्यासाठी उमेदवारी कोणाला मिळाली हा विषय महत्वाचा नाही. उमेदवारी कोणालाही मिळाली तरी आपण स्वतः उमेदवार आहोत या भावनेने आम्ही सर्व कार्यकर्ते या निवडणूकीत काम करणार आहोत.त्यामुळे उस्मानाबाद मतदारसंघातून आगामी लोकसभा निवडणूकीत काँग्रेस आघाडीचा उमेदवार विजयी होणार असा विश्वास सौ.अर्चनाताई पाटील यांनी ‘महाराष्ट्र देशा’शी बोलताना व्यक्त केला.

You might also like
Comments
Loading...