उस्मानाबाद मेडिकल कॉलेज; घोषणा केली भाजपने, पूर्ण केली राष्ट्रवादीने!

उस्मानाबाद : राज्यात उस्मानाबादसह ७ जिल्ह्यांमध्ये नव्या वैद्यकीय महाविद्यालयांच्या स्थापनेची घोषणा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना केली. त्यासाठी आरोग्य विभागास यंदा २९०० कोटी रुपयांची मंजूर करण्यात आले आहे.

उस्मानाबादला १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि त्यास संलग्न ४३० खाटांचे रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय १३ जानेवारी रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. या प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी एकूण रुपये ६७४ कोटी इतका निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे सांगण्यात आले. तसेच आवश्यक तेवढी पदनिर्मिती करण्यास आणि पदे भरण्यास देखील मान्यता देण्यात आली होती.

गेल्या अनेक वर्षांपासून उस्मानाबादमध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरु करावी अशी मागणी होत होती. त्यास आता मूर्त रुप मिळणार आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना येथे वैद्यकीय शिक्षण घेता येणार आहे. त्यासाठी त्यांना पुणे, मुंबई किंवा औरंगाबादला जाण्याची गरज राहणार नाही. भाजप आणि शिवसेनेच्या सत्ता काळात तत्कालीन वैद्यकीय मंत्री गिरीश महाजन यांनी वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा केली होती. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.

त्या दिशेने पाऊल उचलत अधिष्ठाता यांची नेमणूक राज्य सरकारने केली आहे. यामुळे पुढील वर्षापासून शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरु होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयाजवळ नवीन बिल्डिंग तयार आहे. तत्कालीन पालकमंत्री मधुकर चव्हाण यांनीही या सुविधा तयार व्हाव्यात यासाठी काम केलेले होते. गेल्या अनेक वर्षांपासून उस्मानाबादकरांची वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी होती. ती आता पूर्णत्वाकडे गेली आहे. मात्र, त्यासाठी आवश्यक असलेला निधीची घोषणा त्यांनी केलेली नाही. त्यामुळे निधी मिळून महाविद्यालय कधी सुरू होणार याकडे लक्ष लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

IMP