उस्मानाबाद लोकसभा; लढाई राणादादा आणि ओमराजेंची, प्रतिष्ठा पणाला सोपल – राऊतांची

blank

विरेश आंधळकर: उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून आ राणाजगजितसिंह पाटील तर शिवसेनेकडून ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पाटील आणि निंबाळकर कुटुंबात असणारे हाडवैर संपूर्ण राज्याला माहित आहे, आता लोकसभेच्या निमित्ताने दोन्ही परिवारातील युवा नेतृत्व पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. दरम्यान, लोकसभेची लढाई राणादादा आणि ओमराजेंमध्ये असली तरी प्रतिष्ठा पणाला बार्शीचे आ. दिलीप सोपल आणि माजी आ. राजेंद्र राऊत यांची लागल्याचं दिसत आहे.

blank

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असणारा बार्शी विधानसभा मतदारसंघ दरवेळी महत्वाची भूमिका निभावतो, बार्शीतून ज्या उमेदवाराला अधिकचे मताधिक्य मिळते तोच उमेदवार विजयी होणार हे राजकीय गणित आहे. यंदाच्या निवडणुकीत बार्शी तालुक्याचे एकूण मतदान २ लाख ९८ हजारांच्या आसपास आहे. त्यामुळे राष्ट्र्वादी आणि शिवसेना – भाजपने बार्शीवर विशेष लक्ष दिल्याचं दिसत आहे. पुढील तीन – चार महिन्यांनी विधानसभा निवडणुका असल्याने दिलीप सोपल आणि राजेंद्र राऊत यांनी लोकसभेमध्येच प्रत्येक गावामध्ये पोहचण्याचा प्रयत्न चालवला आहे.

blank

पारंपारिक विरोधक सोपल – राऊत प्रचारामध्ये सक्रीय झाल्याने त्यांचे समर्थकही मोठ्या उत्साहाने कामाला लागले आहेत. आ. दिलीप सोपल हे स्वतः शहर आणि तालुक्यात सभा, रॅली काढत भाजप सरकारवर तोफ डागत आहेत, सोपल यांच्या सोबतीने नातू आर्यन सोपल देखील प्रचारात सक्रीय झाला आहे. तर १२ एप्रिल रोजी विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या सभेचे बार्शी शहरात आयोजन करण्यात आले आहे. उमेदवार राणाजगजितसिंह पाटील, माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांनी देखील आपली स्वतंत्र यंत्रणा कामाला लावली आहे. कॉंग्रेसने मात्र राष्ट्रवादीशी फारकत घेत स्वतंत्रपणे प्रचाराला सुरुवात केली आहे.

blank

युतीमध्ये भाजपचे राजेंद्र राऊत यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माढा लोकसभेची विशेष जबाबदारी सोपवली आहे, माढ्यातील फोडाफोडीनंतर राऊत आता उस्मानाबादच्या प्रचारात सक्रीय झाले आहेत. राऊत यांच्या सोबतीने पुत्र आणि बाजार समितीचे अध्यक्ष रणवीर राऊत देखील प्रचारात सक्रीय आहे, राजेंद्र राऊत ग्रामीण भागात तर भाऊ विजय राऊत यांनी शहरातील प्रचारावर भर दिला आहे.

सोशल मीडियाची महत्वाची भूमिका

सोपल आणि राऊत यांचा भर पारंपारिक प्रचारावर असला, तरी त्यांची पुढील पिढी असणारे आर्यन सोपल आणि रणवीर राऊत यांनी सोशल मीडियाची ताकद ओळखलेली आहे. दोन्ही युवा नेत्यांनी तालुक्यातील तरुण कार्यकर्त्यांना सोबत घेत ‘डिजिटल ‘ प्रचारावर भर दिला आहे. दोन्ही पक्षांचे सोशल मीडिया योद्धे गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे मुद्दे मांडत टीकेची झोड उठवत आहेत. blankराष्ट्रवादीसाठी उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांचा तालुक्याशी असलेला घनिष्ट संबध, आ़ दिलीप सोपल यांचा मोठा राजकीय अनुभव, शहरात मोठ्या प्रमाणात असलेला अल्पसंख्यांक समाज जमेची बाजू आहे. तर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पराभव, जिल्हा बँकेची चौकशी, कार्यकर्त्यात आलेली मरगळीमुळे राष्ट्रवादीला फटका बसू शकतो.

तालुक्यात शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर आणि भाजपचे नेते राजेंद्र राऊत ओमराजे यांचा प्रचार करत आहेत, मात्र युतीतील दोन्ही नेते एकमेकांपासून फटकून राहत आहेत. भाजपा सेना युती, देशपातळीवर मोंदीनी केलेले, सर्जिकल स्ट्राईक,तालुक्यात विकासकामांसाठी मिळालेला भरीव निधी युतीसाठी जमेच्या बाजू आहेत तर शेतमालाचे पडलेले दर, सेनेच्या विद्यमान खासदारांचे नॉटरिचेबल धोरण, स्थानिक शिवसेना भाजपा नेत्यांमधील वादामुळे फटका बसू शकतो.