‘उस्मानाबादचे पालकमंत्री आजारी, तात्पुरते आम्हाला दुसरे मंत्री द्या’, आमदाराचे मुख्यमंत्र्यांना साकडे

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री कोरोना संक्रमित असल्याने जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यामध्ये संयुक्त बैठका होत नाहीत. आव्हानात्मक परिस्थिती हाताळण्यासाठी पालकमंत्री आजारातून बरे होईपर्यंत राज्य इतर मंत्री महोदयांना जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्राधिकृत करण्याची मागणी आ. राणाजगजीतसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

आमदार पाटील यांनी म्हटले आहे की, पालकमंत्री शंकरराव गडाख २६ जानेवारीपासून जिल्ह्यात येवू शकले नाहीत. ते कोरोना संक्रमित झाले आहेत, ते लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना आहे. पण, त्यांच्या अनुपस्थितीत इतर कोणतेही मंत्री परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्यात आले नाहीत, ही शोकांतिका आहे. उस्मानाबाद जिल्हा राज्यात आहे की नाही असा प्रश्न जिल्हावासीयांच्या मनामध्ये निर्माण होत आहे. गेल्या आठवड्यात जिल्ह्यात रेमडेसिवीर औषधाचा तुटवडा भासत होता, कोविड सेंटरमधील आहाराबाबत रुग्णांच्या तक्रारी येत आहेत.

कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी टेस्टिंग, ट्रेसिंग व योग्य ट्रीटमेंट या त्रिसूत्रीवर काम करणे गरजेचे आहे. याबाबत ठरवून दिलेल्या नियम व निकषाप्रमाणे कार्यवाही होते की नाही हे पडताळणे गरजेचे असून यावर देखरेख आवश्यक आहे. रुग्ण संख्येचा वेग पाहता खाटांची संख्या वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी भौतिक सुविधांसह औषधे, डॉक्टर्स व सपोर्टिंग स्टाफ गरजेचा आहे. जिल्हा प्रशासन त्यांच्या परीने प्रयत्न करत आहे, परंतु त्यांना अनेक काम करताना अनेक मर्यादा येतात. पालकमंत्री संक्रमित झाल्याने सद्य स्थितीत त्यांना कामाचा व्याप न देता प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयाने यंत्रणा वेगाने कार्यान्वित करण्यासाठी त्यांच्या अनुपस्थितीत इतर मंत्र्यांवर तात्पुरती जबाबदारी देणे आवश्यक आहे असे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.