उस्मानाबाद; संदेश पाठवून ४ लाखाचा ऑनलाईन गंडा!

उस्मानाबाद: मागील काहीवर्षांपासून जिल्ह्यात ऑनलाईन गंडा घालण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. परंतु, प्रशासनांकडे अजूनही ऑनलाईन गंडा घालणाऱ्यांना पडकण्यासाठी पुरेशीक यंत्रणा नसल्याने अशा घटनात वाढ होत चालली आहे. बँक ग्राहकास संदेश पाठवून ४ लाख १० हजार ९२५ रुपयाचा ऑनलाईन गंडा घातल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना कळंब येथे घडली. याप्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात अज्ञात महाठगाविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यापूर्वीही जिल्ह्यात ऑनलाईन फसवणुकीच्या अनेक घटना घडल्या आहेत.

त्यातच पुन्हा ही घटना घडल्याने बँक ग्राहकात भितीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी संबंधित महागठास जेरबंद करावे, अशी मागणी होत आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, कळंब येथील श्रीनिवास तांबरे यांच्या भ्रमणध्वनीवर शनिवारी एक संदेश आला. त्यात तुमच्या बँक खात्यात ४ लाख १० हजार ९२५ रुपये वर्ग करण्यात आले आहेत असा मजकूर लिहिलेला होता. हा मजकूर वाचून तांबरे यांनी त्या संदेशातील लिंक उघडली. त्या लिंकमध्ये तांबरे यांनी स्वत:च्या बँक खात्याची माहिती व पासवर्ड भरले. त्यानंतर काही वेळातच एकूण १६ व्यवहारातंर्गत तांबरे यांच्या खात्यातील रक्कम अन्य खात्यात हस्तांतरीत झाली.

एकूण ४ लाख १० हजार ९२५ रुपये तांबरे यांच्या खात्यातून अन्य खात्यात वळती झाले. आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच श्री. तांबरे यांनी कळंब पोलीस ठाण्यात धाव घेवून फिर्याद दिली. त्यावरून भा.दं.सं. कलम ४२० व माहीती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ सी. अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यासारख्या घटना वारंवार घडत असल्याने नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.

महत्वाच्या बातम्या