fbpx

राज्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात स्टार्टअपचे आयोजन :संभाजी पाटील निलंगेकर

मुंबई : ग्रामीण भागात विविध नवे संकल्पना उपलब्ध असून त्यांना योग्य ती संधी निर्माण करून देण्याच्या उद्देशाने प्रत्येक जिल्ह्यात राज्याच्या धर्तीवर स्टार्ट अप सुरू करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले. राज्य कौशल्य विकास व उद्योजकता विभाग आणि महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत राबविण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र स्टार्ट अप’ सप्ताह 2018 च्या सांगता समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी एस बँक आणि कौशल्य विकास व उद्योजकता विभाग यांत सामंजस्य करार करण्यात आला.

मुंबई येथील ताज विवांता हॉटेल येथे ‘महाराष्ट्र स्टार्ट अप’ सप्ताह 2018 दि.25 जून ते 29 जून पर्यंत आयोजित करण्यात आला होता. या सप्ताहाच्या सांगता समारंभात 100 स्टार्टअपची सादरीकरणासाठी निवड करण्यात आली होती. यातून प्रत्येक क्षेत्रातील तीन अशा 24 उत्कृष्ट कल्पनांची निवड स्टार्टअप सुरू करण्यासाठी केली असून या कार्यक्रमात निवडलेल्या 24 स्टार्टअपना १५ लाखापर्यंतच्या कामाचे कार्यादेश समारंभात प्रदान करण्यात आले. यावेळी आज झालेल्या पाटील निलंगेकर यांच्यासह ज्येष्ठ शास्त्रज्ञ तथा महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे सह अध्यक्ष रघुनाथ माशेलकर, एस बँक च्या ग्लोबल हेड नमिता मिश्रा व इतर मान्यवर उपस्थित होते.

निलंगेकर म्हणाले, 24 स्टार्टअप हे फक्त कागदोपत्री नसून 15 लाखांची वर्क ऑर्डर आज देण्यात आली आहे यात प्रत्येक बाबतीत पारदर्शकता आहे. 100 मधील उरलेल्या 76 स्टार्टअपना पुन्हा पुढील नव्या स्टार्टअप सप्ताहात संधी मिळणार आहे. निवडून आलेल्या 24 स्टार्टअपचे त्यांनी यावेळी अभिनंदन करुन व शुभेच्छा दिल्या.

‘स्टार्ट अप’ सप्ताह 2018 हा असा नाविन्यपूर्ण उपक्रम आहे जो जगाच्या इतिहासात पहिल्यांदा भारतातच नव्हे तर महाराष्ट्रात घडत आहे. चांगल्या विचारांबरोबर चांगली कृती असणे महत्त्वाचे असते, त्यामुळे उत्तम कृतीतून हा कार्यक्रम राबविण्यात आला आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ माशेलकर यांनी यावेळी केले.

हि कल्पना गेले सात महिने उत्तमरित्या राबविण्यात आली आहे. त्यामुळे हे पहिले स्टार्टअप पूर्ण झाले याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. कृषी, शिक्षण व कौशल्य विकास, आरोग्य सेवा, पायाभूत सुविधा व वाहतूक व्यवस्था, फीनटेक आणि सायबर सुरक्षा, शाश्वत विकास, गव्हर्नन्स आणि इतर अशा आठ क्षेत्रातून स्टार्टअपसाठी युवक तसेच सर्वांकडून 2 हजार अर्ज मागविण्यात आले होते. त्यापैकी 900 स्टार्टअपनी नोंदणी केली होती. प्रत्येक क्षेत्रातील तीन अशा 24 उत्कृष्ट कल्पनांची स्टार्टअप सुरू करण्यासाठी यावेळी निवड केली गेली आहे. या 24 स्टार्टअपना 15 लाख रुपयांपर्यंतची कंत्राटे शासनाकडून देण्यात येणार आहेत.

मुंबईत स्टार्ट अप सप्ताह; २४ स्टार्ट अपची होणार अंतिम निवड