मराठा क्रांती मोर्चा जनजागृतीसाठी “भव्य दुचाकी रॅली’चे आयोजन

पुणे : सकल मराठा समाज (पुणे जिल्हा) यांच्या वतीने आज मराठा क्रांती मोर्चा जनजागृतीसाठी “भव्य दुचाकी रॅली’चे आयोजन करण्यात आले आहे .आज सकाळी गुलटेकडी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या रॅलीला सुरवात झाली . तर रॅलीचा समारोप डेक्कन येथील छत्रपती संभाजीराजे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून होईल.
येत्या बुधवारी (दि. 9) क्रांती दिनादिवशी मुंबई येथे “मराठा क्रांती मूक मोर्चा’ काढण्यात येणार आहे. या मोर्चात लाखोंच्या संख्येने समाज उपस्थित राहणार आहे. दरम्यान, या मोर्चाचे वातावरण निर्मिती व्हावी यासाठी सकल मराठा समाज (पुणे जिल्हा) यांच्या वतीन या दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
मुंबईत 9 ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा मराठा क्रांती मुकमोर्चा निघणार आहे. हा मोर्चा राज्यव्यापी असल्याने मागच्या सर्व विराट मोर्च्यांपेक्षा याचे स्वरूप अतिविराट असेल, तो गर्दीचे आजवरचे सर्व जागतिक उच्चांक मोडेल आणि सोबतच त्याच पूर्वीच्याच शांततामय व संविधानिक मार्गाने पार पडेल याबाबत कोणतीही शंका नाही. राज्यकर्ते या खदखदत्या असंतोषाची दखल घेतात व मोर्च्यांच्या मागण्याला न्याय देतात की नाही हे लवकरच कळून येईल. पण या मोर्चांचे दूरगामी परिणाम काय होतील, महाराष्ट्राच्या सामाजिक समिकरणांमध्ये व राजकीय मतपेढ्यांच्या पारंपरिक गणितामध्ये काय बदल होईल या प्रश्नांच्या उत्तरासाठी मात्र काही काळ वाट पाहावी लागणार आहे.