विद्यार्थ्यांसाठी मोफत मानसशास्रीय कार्यशाळेचे आयोजन

पुणे – परिक्षा कालावधित येणारे ताण-तणाव, भावनिक गोंधळ त्यातून होणारे गुंते आणि मानसिक स्वास्थ्य यावर चर्चा तसेच या विषयांशी सुसंगत अशा समुपदेशन चाचण्या, वयक्तिक मानसशास्त्रीय समुपदेशन आणि पॅनलवरिल तज्ञ मान्यवरांशी चर्चा करण्याची संधी विद्यार्थी सहाय्यक समितीमधील विद्यार्थ्यीना मिळाली. दिनांक ४ मार्च २०१८, रविवार रोजी, स्वानुभव इंडिया ह्युमन डेव्हलपमेंट प्रा. लि. संस्थेद्वारा वय वर्ष १८ ते २५ या वयोगटातील व्यक्तिंसाठी “स्वानुभव मानसशास्त्रीय उत्सव २०१८” चे मोफत आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम विद्यार्थी सहाय्यक समितीच्या मोडक सभागृहात भरविण्यात आला होता. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. याच बरोबर कथा-कथन, ड्रम सर्कल, चित्रकला, कविता, खेळ, गाणी आणि नृत्य यां सारख्या कलाकृतींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी एक व्यास्पीठ उपलब्ध झाले असे विद्यार्थ्यांनी सांगितले.

“वयवर्ष १८ ते २५ हे एक उमेदिचे आणि विलक्षण उर्जेने भरलेले वय असते. या वयोगटातील व्यक्ती, या आपल्या ’भावना आणि विचार’ यांची सांगड घालून, आपल्या विवेकबुद्धीचा वापर करू पाहत असतात. आणि याच काळात, सामाजिक दृष्ट्या, त्यांना स्वत:ला ’सिद्ध’ करुन दाखविण्याची देखिल जबर गरज असते. तसेच नाते-संबंध तयार होणे, नोकरी-व्यवसायाची सुरूवात होणे अशा इतर बदलांना या वयोगटातील व्यक्ती सामोरे जात असतात. अनेक वेळा भावनिक गोंधळ आणि विचारांमधील गल्लती या मुळे या व्यक्तींना तितकाच त्रास ही होत असतो. अशा काळात आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी प्रत्येक जण एक हक्काचं आणि सुरक्षीत असं व्यासपीठ शोधत असतं. स्वानुभव इंडिया, अशा प्रकारचं व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी कायम आग्रही राहीले आहे. हा उत्सव देखिल याच विचारावर अधारित असून आलेल्या विद्यार्थ्यांनी त्याचा मनसोक्त आनंद घेतला याचे समाधान वाटते.” असे स्वानुभव इंडियाच्या संचालिका दिपाली अवकाळे यांनी सांगीतले.

“परीक्षेच्या कालावधीत मी खूप टेन्शन मध्ये असते. माझा उद्या पेपर आहे म्हणून मी विचार करत होते की यां कार्यक्रमाला येऊ की नको. माझा वेळ वाया तर नाही ना जाणार वगैरे अशा शंका माझ्या मनात येत होत्या. मात्र कार्यक्रम पूर्ण झाल्यावर मला समाधानी वाटतय. यां कार्यशाळेमुळे मी पूर्ण फ्रेश झाली आणि मला मनातून खूप शांत वाटतय. माझ्या भावना मी इतक्या मोकळेपणान कधीही व्यक्त केल्या नव्हत्या. आज त्यामुळे खूप वेगळं आणि शांत वाटतय. आता मला माझा उद्याचा पेपर अजून चांगला लिहिता येईल अशी मला खात्री आहे.” असे मत  कुसुम गुंटे या विद्यार्थीने मांडले.

यां कार्यक्रमात स्वानुभव इंडिया चे सहकारी समुपदेशक शिवाजी अत्रे, तेजस्विनी भावे, पल्लवी परांजपे आणि स्वयंसेवक गायत्री गुरव, स्नेहल सिन्नलकर, जयसिंग ठाकरे, निलेश ठाकरे, अश्विन अवकाळे, आकाश घुमे, अकाश मोहिते उपस्थित होते.