fbpx

मराठा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, वैद्यकीय प्रवेशासाठी अध्यादेश जारी

टीम महाराष्ट्र देशा : महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशा संदर्भात मोठी घोषणा केली आहे. वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश घेणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांना राज्य सरकार कडून मोठा दिलासा मिळाला आहे. पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी मराठा आरक्षण सुधारित अध्यादेश जारी करण्यात आल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले आहे. राज्यपालांच्या स्वाक्षरीसाठी अद्यादेश राज्यपालांकडे पाठवण्यात आल्याचेही त्यांनी म्हंटले आहे.

वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशा संदर्भात राज मंत्रिमंडळाची बैठक आज झाली. त्या बैठकीनंतर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची पत्रकार परिषद झाली. त्यावेळी, पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी मराठा आरक्षण सुधारित अध्यादेश जारी करण्यात आला आहे. राज्यपालांच्या स्वाक्षरीसाठी अद्यादेश राज्यपालांकडे पाठवण्यात आला आहे. असे चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले.
इतकेच नव्हे तर, वैद्यकीय महाविद्यालयामधील जागा वाढवून देण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. त्याबरोबरच आतापर्यंत वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये झालेले प्रवेश कायम ठेवण्यात येतील. तसेच खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खासगी क्षेत्रातील महाविद्यालयात प्रवेश घेतल्यास त्यांना शिष्यवृत्ती देण्यात येईल. अशी घोषणाही त्यांनी केली. यावेळी, शिक्षण मंत्री विनोद तावडे, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन उपस्थित होते.

वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमात मराठा आरक्षणासंदर्भातली राज्य सरकारची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाने जोरदार दणका दिला. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. यावेळी तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही, असं आश्वासनं मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना दिले होते.
याच मुद्द्यावरून मराठा समाजातील वैद्यकीय विद्यार्थ्यांनी आझाद मैदानात आंदोलन छेडलंय. इतकेच नव्हे तर, राज्य सरकारने त्वरित वटहुकूम काढून वैद्यकीय प्रवेशाचा मार्ग मोकळा करावा, अन्यथा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्यात वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशाबाबत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर बैठक झाली. या बैठकीनंतर हालचालींना वेग आला असून वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन आझाद मैदानावर विद्यार्थ्यांची भेट घेतली होती.
त्यानंतर काल रात्री राज्य सरकारने वैद्यकीयच्या पदव्युत्तर प्रवेशाला आठवडाभराची मुदतवाढ देण्याचा महत्वाच्या निर्णय घेतला होता. त्या निर्णयाला प्रवेश नियंत्रण समितीने मंजुरी दिली असल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली होती.