२५ वर्षे पैसे भरुनही अयोग्य कारणाने क्लेम नाकारणाऱ्या कंपनीला ग्राहक मंचचा दणका, व्याजासह रक्कम देण्याचे आदेश

Health insurance company

औरंगाबाद :  २५ वर्षांपासून आरोग्य विमा काढत आहे, कधीही विम्याचा लाभ घेतला नाही, परंतु गरज पडल्यावर दवाखान्यात आलेल्या खर्चाचा क्लेम करण्यासाठी कंपनीकडे दावा दाखल केल्यानंतर कंपनीने विविध कारणे देत विमा नाकारला. यामुळे ग्राहकाने ग्राहक मंचात तक्रार केल्यानंतर
जिल्हा ग्राहक मंचाने विमा कंपनीला दावा केलेली रक्कम ९ टक्के प्रतिवर्ष व्याजाने देण्याचे आदेश दिले आहे.

औरंगाबाद येथील सुमीत नावंदर हे ओरिअंटल इन्शुरन्स कंपनीकडून १९९५ पासुन आरोग्य विमा घेत आहे. २०१९ पर्यंत त्यांनी विमा कंपनी कडून कुठलाही क्लेम घेतला नाही. २०१९ मध्ये नावंदर याना जबड्याचा आजार झाला व डॉक्टरानी सदर आजारावर शस्त्रक्रिया करावी लागेल असे सांगितले. त्यानुसार नावंदर यांनी सदरच्या आजारावर शस्त्रक्रिया केली व त्यासाठी त्यांना ४,५०,००० रुपये इतका खर्च आला होता. नावंदर यांनी त्यांचा मेडीक्लेम ३,००,००० इतक्या रक्कमेचा असल्यामुळे तितक्या रक्कमेचा क्लेम विमा कंपनीकडे सादर केला. परंतु विमा कंपनीने सदरचा क्लेम हा दातांच्या आजाराचा आहे असे कारण देवून नाकारला. त्यामुळे नावंदरयांनी जिल्हा ग्राहक आयोगात तक्रार दखल केली होती.

तक्रारीच्या सुनावणी दरम्यान नावंदर यांच्या वकिलाने ग्राहक आयोगाच्या निदर्शनास आणुन दिले की, सदरचा आजार हा दातांशी संबंधित नसुन जबड्याचा आहे, तसा अहवाल देखील डॉक्टरांनी विमा कंपनीला दिलेला असताना देखील विमा कंपनीने जाणूनबूजून तक्रारदाराला रक्कम दिली नाही, विमा कंपनीची व तक्रारदाराची बाजू ऐकून विमा कंपनीने तक्रारदाराचा प्रस्ताव अयोग्य कारणाने नाकारला असे निरीक्षण नोंदवत विमा कंपनीला तक्रारदाराला ३,००,००० इतकी रक्कम ९% प्रतिवर्ष इतक्या व्याजासह देण्याचा आदेश दिला. तक्रारदार सुमित नावंदर यांच्यातर्फे ॲड. योगेश सोमाणी यांनी काम पाहीले त्यानां ॲड. हेमंत जाजू व अमोल गायकवाड यांनी सहकार्य केले.

महत्त्वाच्या बातम्या