नागराज मंजुळेंना दणका! ७ दिवसात विद्यापीठाचे मैदान खाली करण्याचे आदेश

चित्रपटाच्या शूटिंगसाठी नियमबाह्य पद्धतीने उभारला होता सेट

पुणे : सिनेदिग्दर्शक नागराज मंजुळे यांना चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी मैदान भाड्याने दिल्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अडचणीत आले आहे. सिनेमाच्या चित्रीकरणासाठी मैदान भाड्याने देऊन लीजच्या कराराचा भंग केल्याचा ठपका पुणे शहर तहसील कार्यालयाने विद्यापीठावर ठेवला होता. त्यामुळे  चित्रपटाच्या शूटिंगसाठी नियमबाह्य पद्धतीने उभारलेला सेट ७ दिवसात काढण्याच्या सूचना नागराज मंजुळे यांना दिल्या आहेत. तसे पत्र देखील मंजुळे यांना दिल्याचे कुलगुरू डॉ. करमळकर यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

कुलगुरू डॉ. करमळकर यांनी नियमबाह्य पद्धतीने नागराज मंजुळे यांना चित्रपटाच्या शुटींग साठी मैदान भाड्याने दिले असल्यामुळे विद्यार्थांना गैरसोईचा सामना करावा लागला होता. माध्यमांनी हे प्रकरण उचलून धरल्यानंतर अखेर आज विद्यापीठाला जाग आली. आणि मंजुळे यांना ७ दिवसात शुटींग साठी उभारण्यात आलेला सेट काढण्याचे आदेश दिले.

कुलगुरू डॉ. नितीन कळमकर यांनी परस्पर निर्णय घेऊन. विद्यार्थांचे खेळण्याचे मैदान दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना भाड्याने दिले होते. त्यानंतर विद्यार्थांना खेळण्यास मैदान उपलब्ध नसल्यामुळे माध्यमांनी या निर्णयाला विरोध केला होता. परंतु विद्यापीठाने कुणालाही न जुमानता मंजुळेना मैदान भाड्याने दिले. शासनाच्या अंतर्गत येणारी कोणतेही जमीन भाड्याने द्यायची असेल तर राज्य सरकार, विद्यापीठाची व्यवस्थापन परिषद आणि उच्चशिक्षण संचालनालय यांची परवानगी घेण आवश्यक असते.

मात्र कुलगुरूंनी यापैकी कुणाचीही परवानगी न घेता मनमानी करून मैदान भाड्याने देण्याचा परस्पर निर्णय घेतला होता. या प्रकरणाची तक्रार जिल्हा अधिकारी कार्यालय आणि उच्चशिक्षण संचालनालय यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानंतर या दोन्ही विभागांनी विद्यापीठाची चौकशी करून विद्यापीठाला नोटीस बजावली होती. अखेर मंजुळे यांना ७ दिवसात शुटींग साठी उभारण्यात आलेला सेट काढण्याचे आदेश विद्यापीठाकडून देण्यात आले आहेत.