नागरिकांकडे नोंदणीकृत भाडेकरार आणण्याचे बंधनकारक करण्याचे आदेश

सोलापूर : शहरातील नागरिकांकडून पोलीस ठाण्यामध्ये पडताळणीसाठी विविध प्रकारची कागदपत्रे येतात. यामध्ये अनोंदणीकृत व केवळ नोटरी केलेले कागदपत्रांचाही समावेश असतो. पोलीस अधिकाऱ्यांनी पडताळणी दरम्यान नागरिकांकडे नोंदणीकृत भाडेकरार आणण्याचे बंधनकारक करावे, असे पत्र पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षकांना दिल्याची माहिती मुद्रांक जिल्हाधिकारी साहेबराव दुतोंडे यांनी दिली.

पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षक यांच्या अधिपत्याखालील कार्यालयांना साध्या पद्धतीने केले जाणारे करार नोंदणीकृत आहेत का, ते तपासण्याबाबात सूचना द्यावी, अशाही सूचना पत्रामध्ये केली आहे. शहरामध्ये सर्रासपणे मुद्रांक व साध्या कागदावर भाडेकरार करून नोटरी केली जाते. भाडेकरारांची नोंदणी करण्यासाठी ई रजिस्ट्रेशन सुविधा नोंदणी व मुद्रांक विभागातर्फे देऊनही भाडेकरार नोंदणीकृत केली जात नाही.

यामुळे मोठ्या प्रमाणावर शासनाचा महसूल बुडत आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांना जागा, दुकान, गाळा वा इतर स्थावर मिळकतीसंबंधी भाडेकरार दस्त नोंदणीकृत करण्यात यावे. अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे मुद्रांक जिल्हाधिकारी दुतोंडे यांनी सांगितले.