घोडगंगा सहकारी साखर कारखान्यावर भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आदेश

पुणे : शिरुर तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखाना हा भ्रष्टाचाराचा कारखाना बनला आहे कि काय असा सवाल उपस्थित झाला आहे. कर्जाचा भलामोठा डोंगर या कारखान्यावर असताना आता कारखान्याची तब्बल पाच एकर जमीन एका खासगी संस्थेला दिल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. दरम्यान, कारखान्यातील भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आदेश सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले आहेत. त्यामुळे भाजप सरकारने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे निकटवर्तीय अध्यक्ष अशोक पवार यांना धोबीपछाड दिल्याची चर्चा आहे.

घोडगंगा सहकारी साखर कारखान्यावर तब्बल १८१ कोटी रुपयांचे कर्ज आहे. २०१८-२०१९ च्या अंदाजपत्रकात कारखान्याने ३७ कोटी ९४ लाख रुपयांची कर्जफेड केल्याचे नमूद केले आहे. मात्र, तरीही कारखान्यावर अद्याप १५० कोटी रुपयांचे कर्ज आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार अशोक पवार यांच्यावर सहकारी कारखाने बंद पाडायचे आणि खासगी कारखाने सुरू ठेवायचे, असा घाट घातला जात असल्याचे आरोप करण्यात आले आहेत. कारखान्यातील भ्रष्टाचारा विरोधात शेतकऱ्यांचं कारखान्याबाहेर उपोषण देखील सुरु आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सहकार मंत्र्यांनी घोडगंगा साखर कारखान्यातील भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

या सर्व धक्कादायक प्रकारामुळे सहकारी कारखाना तोट्यात मात्र अजित पवारांचे निकटवर्तीय अध्यक्ष अशोक पवार यांच्या नातेवाईकाचा खासगी कारखाना सुस्थितीत, असं चित्र इथे पाहायला मिळत आहे. दरम्यान, या सर्व प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना धोबीपछाड देण्याची तयारी सरकारने केल्याचं चित्र आहे.