मुंबई : देशावर कोरोनाची तिसरी लाट येण्याची दाट शक्यता असतानाच आता उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा शनिवारी(८ जाने.) केंद्रीय निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा(Sushil Chandra) यांनी केली. याच मुद्द्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी आपल्या आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून याविषयी भाष्य केले आहे. तसेच विरोधकांनी नियमावली पाळायची आणि सत्ताधाऱ्यांनी ती धुडकावली तरी निवडणूक आयोगाने त्याकडे कानाडोळा करायचा, हे प. बंगालच्या विधानसभा निवडणुकीतही स्पष्टपणे जाणवले आहे, असेही राऊत म्हणाले.
लेखात राऊत म्हणाले आहेत की,’कोरोना संकट असले तरी निवडणूक टाळणे घटनात्मक बंधनांमुळे शक्य नाही आणि वेळेत निवडणुका घेणे ही आयोगाची जबाबदारी असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी सांगितले आहे. कोरोना किंवा ओमायक्रोनचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सुरक्षित निवडणूक घेण्यासाठी नियमावली लागू करू, असे मुख्य निवडणूक आयोगाने सांगितले, पण ही नियमावली नक्की कोणासाठी? विरोधकांनी ती पाळायची व सत्ताधाऱ्यांनी धुडकावली तरी निवडणूक आयोगाने त्याकडे कानाडोळा करायचा, हे प. बंगालच्या विधानसभा निवडणुकीतही स्पष्टपणे जाणवले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर असताना व निवडणूक आयोगाने काही बंधने घातली असताना पंतप्रधान, गृहमंत्री, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री यांच्यासह जबाबदार पदांवर असलेले लोक लाखालाखांच्या सभा घेत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तयारी करताना दिसत होते. प. बंगालातील निवडणुकीत आयोगाची वर्तणूक खरेच निःपक्षपाती होती काय, याचे चिंतन त्यांनी स्वतःच केले पाहिजे. अनेक खोटी प्रकरणे निर्माण करून त्यावर गोंधळ घातला गेला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना नंदिग्राम मतदारसंघातून आधी विजयी घोषित केले व नंतर निकाल फिरविण्यात आला.
दरम्यान, लोकमताचा प्रचंड रेटा होता म्हणून प. बंगालात ममता बॅनर्जींचा विजय पेंद्रीय यंत्रणा रोखू शकली नाही. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर तेव्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले. घटनात्मक बंधने तेव्हाही होतीच. त्याचे पालन झाले काय? पण सुशील चंद्रा यांनी आता पाच राज्यांतील निवडणुकांत घटनेची बूज राखण्याची भाषा केली आहे, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन, असेही राऊत म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- ‘…तर घटनात्मक तरतुदींनुसार करायच्या इतर अनेक गोष्टी का डावलल्या जातात?’
- कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक निकालानंतर जल्लोष करणाऱ्यांवर गुन्हे दाखल
- भारतीय जवानांच्या धैर्यापुढे साक्षात हिमालय सुद्धा झुकला; व्हिडीओ व्हायरल
- पुण्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ; महापौर म्हणाले…
- ‘राबडीदेवी म्हटलं फूलन देवी नाही’; रश्मी ठाकरेंवरच्या ‘त्या’ व्यक्तव्याला चंद्रकांत पाटलांचे समर्थन
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<