विरोधकांनी पालिका सभागृहात वाजवले भाजपच्या नावाने ढोल

पुणे महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या रोप्य महोत्सवी पर्वाला सुरुवातीपासूनच विघ्न लागल्याचे दिसून येत आहे. आधी खासगी प्रसिद्धी संस्था नेमल्याने भाजपचा अंतर्गत कलगीतुरा रस्त्यावर आला, त्यानंतर बाईक रैलीचा फज्जा आणि आता विश्व विक्रमी ढोल वादनाचा कार्यक्रम रद्द करत पुढे ढकलण्याची वेळ, या सर्व कारणांमुळे सत्ताधारी भाजपला मोठ्या नामुष्कीला समोर जाव लागत आहे. सोमवारी याच कारणावरून मनसे, शिवसेना, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी ढोल वाजवत निषेध व्यक्त केला. शहराच्या विकासाकडे सत्ताधाऱ्यांचा दुर्लक्ष होत आहे, असा आरोप करत विरोधकांनी आंदोलन केल आहे.

दरम्यान आंदोलनासाठी विरोधक सभागृहात ढोल घेवून जात असताना पालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडवले. तसेच सभागृह नेते श्रीनाथ भिमाले आणि काही भाजप नगरसेवकांनीही सभागृहात ढोल आणण्यास विरोध करत मनसेचे वसंत मोरे आणि इतरांना ढकलण्यास सुरुवात केली. यामुळे सभागृहाच्या दारातच जोरदार झटापट झाल्याने वातावरण तणावपूर्ण झाले होते.

भाजप सत्तेच्या जोरावर आपल्याला हवे तसे कार्यक्रम राबवत आहे. पालिकेचा जनसंपर्क अधिकारी असताना खासगी संस्थेला काम दिले जाते. दुसरीकडे बाईक रैलीला शंभर लोक पण गोळा होत नाहीत आणि आता ढोल वादनाचा कार्यकम या सर्व गोष्टींचा निषेध करण्यासाठी आम्ही आंदोलन करायला गेल्यावर दडपशाही केली जात आहे. मात्र आम्ही सत्ताधाऱ्याना जशास तसे उत्तर देवू- रुपाली पाटील माजी नगरसेविका