fbpx

तुतिकोरीन हिंसाचाराला विरोधक जबाबदार – पलानीस्वामी

चेन्नई – तामिळनाडूतील तुतिकोरीन शहरात वेदांता ग्रुपच्या स्टारलाईट कॉपर प्लांटविरोधात तीव्र आंदोलन सुरु असून, स्टारलाईट कॉपर कारखान्यातून होणाऱ्या प्रदूषणाविरोधात हे आंदोलन करण्यात येतय. कंपनीच्या विस्ताराचं वृत्त समोर आल्यापासून आंदोलन अधिकच तीव्र होत चाललं आहे. या आंदोलनाला अचानक हिंसक वळण लागल्याने आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ११ जणांना आपला जीव गमवावा लागला.

पोलिसांच्या कारवाईत अकरा जणांचा मृत्यू झाल्यामुळे तमिळी जनतेमध्ये संतापाची लाट आहे. दरम्यान तुतिकोरीन येथील हिंसाचाराला प्रतिस्पर्धी राजकीय पक्षांनी चिथावणी दिल्याचा आरोप तमिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी केला आहे.

राज्याच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशावरून प्रकल्पाचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्यानंतर काही समाजकंटकांनी स्टरलाइट प्रकल्पविरोधी निदर्शनांमध्ये घुसखोरी केली आणि हिंसाचार घडविला, असा दावा पलानीस्वामी यांनी केला.

तुतिकोरीन येथे घडलेला प्रकार दुर्दैवी आहे असे स्पष्ट करून मुख्यमंत्र्यांनी, पोलीस गोळीबारांत ठार झालेल्यांना आदरांजली वाहिली. सदर प्रकल्प बंद करण्यासाठी यापूर्वी झालेली निदर्शने शांततेत पार पडली होती, असेही ते म्हणाले. दरम्यान या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात येईल असं त्यांनी सांगितले.