fbpx

पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबाबत विचार करण्याची गरज नाही – शरद पवार

टीम महाराष्ट्र देशा : याआधीच्या काँग्रेस नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारने चांगले काम केले. २००४ मधील सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी युतीने कोणत्याही नेत्याचे नाव पंतप्रधानपदासाठी पुढे केले नव्हते. मात्र, आम्ही दहा वर्षे यशस्वीरित्या सरकार चालविले, असा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांनी प्रस्तावित महाआघाडीच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबाबत विचार करण्याची गरज नाही, असे स्पष्ट संकेतचं शरद पवार यांनी दिले आहेत.

लोकसभा निवडणूक तोंडावर असताना राजकीय घडामोडी वेगाने सुरू आहेत. गुजरातमधील वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री शंकर सिंह वाघेला यांनी मंगळवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यानिमित्ताने येथे पत्रकारांशी बोलताना पवार यांनी महाआघाडीच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबाबत भाष्य केले आहे.

दरम्यान, आम्ही महाआघाडीसाठी प्रत्येक राज्यात एका मजबूत पक्षाच्या मागे उभे राहण्याचा प्रयत्न करत आहोत. तामिळनाडूत डीएमके, आंध्र प्रदेशमध्ये तेलगू देसम पार्टी आणि पश्चिम बंगामध्ये तृणमूल काँग्रेस मजबूत स्थितीत आहे. भाजपला टक्कर देण्यासाठी इतर पक्षांनी या प्रादेशिक पक्षांच्या मागे उभे राहण्याची गरज आहे, असेही पवार यांनी नमूद केले आहे.