राज्यातील विरोधी पक्षाने जनतेचा विश्वास आणि प्रतिष्ठा गमावली आहे- संजय राऊत

राज्यातील विरोधी पक्षाने जनतेचा विश्वास आणि प्रतिष्ठा गमावली आहे- संजय राऊत

sanjay raut

मुंबई: सध्या सत्ताधारी आणि विरोधकांत कलगीतुरा रंगला आहे. विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यातच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली. यावरच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आता विरोधी पक्षावर टीका केली आहे.

महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने जनतेचा विश्वास आणि प्रतिष्ठा गमावली आहे. ‘विश्वास गमावला’ असे खरे तर एखाद्या सरकारविषयी बोलण्याची पद्धत आहे, पण महाराष्ट्रात गंगा उलटी वाहताना दिसत आहे. येथे विरोधी पक्षाचे रोजच हसे होत आहे. विरोधी पक्ष हा चेष्टेचा विषय बनला आहे व लोकशाहीसाठी हे चांगले लक्षण नाही. केंद्रातील भाजपा धुरिणांना ‘विरोधी पक्ष’, ‘विरोधी सूर’ या संसदीय लोकशाहीच्या संकल्पनाच मान्य नाहीत, पण महाराष्ट्राला लोकशाहीची परंपरा आहे. त्यामुळे विरोधी पक्षाने त्यांचे काम निर्भयपणे करत राहावे या मताचे आम्ही असल्याचे संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून म्हटले आहे.

महाराष्ट्राला विरोधी पक्षनेत्यांची चांगली परंपरा आहे. भाई श्रीपाद अमृत डांगे, उद्धवराव पाटील, दत्ता पाटील, मनोहर जोशी, गोपीनाथ मुंडे, खडसे, शरद पवारसुद्धा विरोधी पक्षनेते होते. फक्त बेछूट आणि बेफाम आरोप करायचे व सरकार पाडण्याच्या तारखांचा घोळ करायचा हेच विरोधी पक्षनेत्यांचे काम नसते. सरकारचे जेवढे आयुष्य आहे, तेवढे आयुष्य सरकारला मिळणारच आहे. सरकारच्या आयुष्याची दोरी तुमच्या हातात नाही. सरकार कधी गेले हे कळणारही नाही असे फडणवीस म्हणतात. हा त्यांचा निव्वळ अहंकार आहे. खरे तर फडणवीसांचे मुख्यमंत्रीपद कसे गेले हेच त्यांना अजून समजू शकलेले नाही. त्यामुळे फडणवीस किंवा पाटील जे बोलतात ते किती गांभीर्याने घ्यायचे? हा प्रश्नच आहे. असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या