शिवसेना आमदार विजय औटी यांना नगरपंचायत नगराध्यक्ष निवडणुकीआधी विरोधकांचा दे धक्का

अहमदनगर / प्रशांत झावरे : गेल्या १४ वर्षांपासुन पारनेर तालुक्याचे आमदार असलेले व पारनेर शहरावर वर्चस्व असलेले तसेच नव्यानेच स्थापन झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत अडीच वर्षांपूर्वी सत्ता हस्तगत करून नरगपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा लावलेले शिवसेनेचे आमदार विजयराव औटी यांच्या सर्व विरोधकांनी एकत्र येत काही असंतुष्ट शिवसेना नगरसेवकांच्या मदतीने २३ तारखेच्या नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष निवडीपूर्वी आव्हान निर्माण केले आहे, शिवसेनेचे काही असंतुष्ट नगरसेवक विरोधकांबरोबर अज्ञात स्थळी सहलीला गेले असून आता नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ट्विस्ट निर्माण झाला आहे.

आता २३ तारखेला होणाऱ्या निवडणुकीत काय होणार व कोण कोणते नगरसेवक नगराध्यक्ष निवडीत आमदार विजयराव औटी यांना साथ देणार व कोण कोण विरोधी गोटात सहभागी होणार, तसेच आमदार विजयराव औटी विरोधकांचे आव्हान परतवून लावून नागरपंचायतीवर सत्ता कशा प्रकारे राखतात की विरोधकांची सरशी होते हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार असून याकडे पारनेर शहरासह तालुक्याचे व जिल्ह्याचेपण लक्ष लागले आहे.

दरम्यान या राजकीय घडामोडीमुळे आमदार विजयराव औटी यांच्या समर्थकांमध्ये खळबळ उडाली असून असंतुष्ट नगरसेवकांचा शोध घेण्याचे काम चालू झाले आहे. अडीच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेला ९ जागा मिळाल्या होत्या व निवडणुकीनंतर काही अपक्ष नगरसेवकांनी शिवसेनेला साथ दिल्याने ही संख्या १२ झाली होती, परंतु ५ नगरसेवक हे आमदार विजयराव औटी यांच्या कायम विरोधात होते.

त्यापैकी एक म्हणजे आमदार विजयराव औटी यांचे कट्टर विरोधक माजी पंचायत समिती सदस्य शंकरराव नगरे यांच्या पत्नी अपक्ष नगरसेवक वर्षा शंकर नगरे यांनी आता होत असलेल्या नगराध्यक्ष निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी विरोधकांकडून अर्ज भरला आहे. वर्षा शंकर नगरे या आमदार विजयराव औटी राहत असलेल्या व त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे मतदान असलेल्या वार्ड मधून धडाक्यात निवडून आलेल्या आहेत.

पारनेर नगरपंचायतीचा अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर होणाऱ्या या निवडणुकीत सत्ताधारी शिवसेनेकडून वैशाली आनंदा औटी यांनी अर्ज दाखल केला असून विरोधकांनी वर्षा शंकर नगरे यांचा अर्ज भरला आहे. परंतु शिवसेनेने दिलेल्या उमेद्वारीवर काही शिवसेना नगरसेवक व शिवसेनेला मदत केलेले अपक्ष नगरसेवक नाराज असल्याचे दिसून आले आहे. काही नगरसेवकांना अडीच वर्षांपूर्वी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष करण्याचा शब्द आमदार विजयराव औटी यांनी दिल्याचे समजते. परंतु दिलेला शब्द नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत फॉर्म भरताना न पाळल्याने काही नगरसेवक प्रचंड नाराज झाले आहेत.

तर उपनगराध्यक्ष पदावर आमदार विजयराव औटी यांचे सुपुत्र विद्यमान उपनगराध्यक्ष अनिकेत औटी यांचीच निवड निश्चित असल्याचे मानले जात असताना आपण शिवसेनेत फक्त नगरसेवक म्हणूनच थांबायचे का? राजकारणात दिलेल्या शब्दाला काहीच महत्व नाही का? पुत्र प्रेमासाठी आमदार विजयराव औटी आता जसे वागत आहेत, उद्याही तसेच वागतील? आपण फक्त माना डोलवयाच्या का? हे आणि असे अनेक प्रश्न शिवसेनेला मदत करणाऱ्या व शिवसेनेत असणाऱ्या नगरसेवकांना पडल्याने शिवसेनेतील व शिवसेनेला मदत करणाऱ्या नगरसेवकांनी आमदार विजयराव औटी यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून पारनेर शहरावर आमदार विजयराव औटी यांचे एकहाती वर्चस्व आहे परंतु पारनेर नगरपंचायत निवडणुकीत अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेला तसे काठावरच बहुमत मिळाले होते. परंतु आता जर सत्ता ताब्यातून गेली तर पुढील विधानसभेच्या दृष्टीने आमदार विजयराव औटी यांना त्यांच्या होम ग्राउंडवरच जबर धक्का बसणार आहे.

त्यामुळे विधानसभेच्या १ वर्ष अगोदरच आमदार विजयराव औटी यांना विरोधकांनी घेरण्यास व शह देण्यास चालू केले असल्याचे चित्र दिसत असून बंडखोर नगरसेवकांनी निर्माण केलेल्या आव्हानाला आमदार विजयराव औटी कशाप्रकारे सामोरे जातात व अडीच वर्षांपूर्वीच स्थापन झालेल्या नागरपंचायतीवर आपले वर्चस्व कायम ठेवतात की विरोधक आमदार विजयराव औटी याना त्यांच्याच होम ग्राउंडवर अडीच वर्षातच नामोहरम करण्यात यशस्वी होतात हे आता २३ तारखेला दिसणार असून, पारनेर शहरासह, तालुक्यात व जिल्ह्यात या राजकीय उलथापालथीमुळे खळबळ उडाली आहे.