सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार १६ व्या ‘पिफ’चे उद्घाटन

सुधीर मुनगंटीवार

पुणे : पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात ‘पिफ’ यंदा ११ ते १८ जानेवारी, २०१८ दरम्यान पार पडणार आहे. उद्या गुरुवार दि. ११ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता कोथरूड येथील सिटीप्राईड मल्टीप्लेक्स या ठिकाणी महोत्सवाचा उद्घाटन समारंभ होणार असून राज्याचे अर्थ, नियोजन आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडेल, अशी माहिती महोत्सवाचे अध्यक्ष व संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी कळविली आहे.

महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात भारतीय चित्रपटसृष्टीसाठी दिलेल्या अद्वितीय योगदानाबद्दल अनेक गाजलेल्या हिंदी चित्रपटांचे प्रसिद्ध दिग्दर्शक रमेश सिप्पी, निर्माते व ‘प्रसाद स्टुडिओज्’चे प्रमुख रमेश प्रसाद यांना ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’त (पिफ) ‘पिफ डिस्टिंग्विश्ड अॅवॉर्ड’ हा विशेष पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात येईल, तर प्रसिद्ध गायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांना ‘एस. डी. बर्मन आंतरराष्ट्रीय क्रिएटिव्ह अॅवार्ड’ या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.

याशिवाय या उद्घाटन सोहळ्यात दिग्दर्शक राज कपूर यांच्या २३ चित्रपटांच्या ‘निगेटिव्ह’ प्रतींचा मौल्यवान ठेवा त्यांचे पुत्र अभिनेते रणधीर कपूर आणि ऋषी कपूर ‘पिफ’मध्ये उपस्थित राहून राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे देखभालीसाठी सुपूर्द करणार आहेत. याबरोबर उद्घाटन समारंभानंतर अॅलन ड्रल्जेविक दिग्दर्शित ‘मेन डोन्ड क्राय’ हा बोस्नियन भाषेतील चित्रपट दाखवून महोत्सवाला सुरूवात होईल.

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे हे १६ वे वर्ष असून ‘तरुणाई’ ही या महोत्सवाची संकल्पना आहे. संपूर्ण महोत्सवात या वर्षी तब्बल ९१ देशांमधून १००८ चित्रपट प्राप्त झाले होते. यातील निवडक असे २०० हून अधिक चित्रपट पाहण्याची संधी पुणेकरांना उपलब्ध होणार आहे. चित्रपटांबरोबरच चित्रपटांशी संबंधित विविध कार्यशाळा, चर्चासत्रे आणि प्रदर्शन यांचाही महोत्सवात अंतर्भाव असेल, असेही डॉ. पटेल यांनी यावेळी नमूद केले.