fbpx

संविधान स्वत:च सक्षम, विरोधक काय वाचविणार ? – मुख्यमंत्री

मुंबई: संविधान स्वत:च सक्षम आहे, त्याला विरोधक काय वाचविणार ? मुळात दुरूपयोग करता येईल, इतके संविधान कच्चे नाही. सत्तेत असताना याच संविधानाची शपथ घ्यायची आणि भ्रष्टाचार करायचा आणि विरोधात बसले की स्वत:चे पविण्यासाठी याच पवित्र संविधानाचा आसरा घ्यायचा. राजकारण हे इतक्या नीच पातळीचे नसावे. ज्या ज्या वेळी संविधानावर आघात करण्याचे प्रयत्न झाले, तेव्हा तेव्हा संविधानानेच त्यांना दंडित केले, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना प्रत्त्युत्तर दिले.भाजपाच्या तिरंगा एकता रॅलीचा समारोप कामगार मैदानात झाला. त्यावेळी फडणवीस बोलत होते.

फडणवीस म्हणाले की, आज ज्यांनी संविधान बचाव रॅलीचे आयोजन केले. त्यासाठी १८ पक्ष एकत्र आले. पण ते केवळ १,८०० लोक जमवू शकले आणि एकट्या भाजपाने जेव्हा तिरंग्याचा सन्मान करण्यासाठी लोकांना आवाहन केले. तेव्हा कामगार मैदान गच्च भरले. संविधानाचा सन्मान खर्‍या अर्थाने करायचा असेल तर तो शेवटच्या घटकाच्या उन्नतीत आहे. गरिबांना घरे, महिलांना स्वयंपाकाचा गॅस, युवकांना मुद्रा कर्ज हे सारे काही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमुळे घडत आहे. संविधान हा आमचा धर्म आहे.

आम्ही सत्ता उपभोगायला सरकारमध्ये नाही तर सेवा करण्यासाठी आहोत. महाराष्ट्रात ज्यांची दुकानदारी संपली, ते समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, आम्ही ते होऊ देणार नाही. हा आवाज भाजपचा आहे, आमचा आवाज बंद करण्याची कुणाचीही हिंमत नाही, असेही फडणवीस म्हणाले.