विद्यापीठ राजकारणात मुख्यमंत्र्याच्या भावाची केवळ चर्चाच

prasenjit

संदीप कापडे, पुणे : विद्यापीठ कायद्यात बदल झाल्यानंतर यावर्षी सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठात नवीन बदला सह निवडणूक होणार आहे. राज्य पातळीवरील राजकारणाचे पडसाद आता विद्यापीठात दिसू लागले आहेत. विद्यापीठाच्या आधिकार मंडळाची निवडणूक होणार आहे. त्यासाठी खुद्द पदवीधर गटातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चुलतबंधू प्रसेनजीत फडणवीस रिंगणात उतरण्याची चर्चा आहे.  मात्र प्रसेनजीत यांनी चर्चा नाकारली असून चर्चा करणारे फक्त चर्चाच करतात. अश्या प्रकारची कुठलीही विचारणा मला करण्यात आली नाही असे प्रसेनजीत फडणवीस यांनी महाराष्ट्र देशाशी बोलतांना स्पष्ट केले.

विद्यापीठ निवडणुकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी जातीने लक्ष घातले आहे. तसेच पुण्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना तश्या सूचना दिल्याचे समजते. निवडणुकीची तयारी गेल्या दोन महिन्यापासून सुरु आहे. भावाच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांनी फिल्डिंग लावल्याची चर्चा आहे. त्यामुळे निवडणूक रंगतदार होणार आहे. तसेच पदवीधर मतदारांची नोंदणीदेखील करण्यात आली आहे. विद्यापीठात एकूण ७२ जागेसाठी निवडणूक होणार आहे. त्यातील १० जागा पदवीधरांसाठी आहेत.

विद्यापीठ कायद्यात झालेल्या बदलानंतर होणारी ही पहिलीच निवडणूक असून केंद्र ते राज्य भाजपची सत्ता असल्याने विद्यापीठ पातळीवर काम करणाऱ्या कार्यकर्ते जोमाने निवडणुकीत भाग घेतील. या पूर्वीच्या काळात विद्यापीठाच्या राजकारणात भाजप, विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना नेहमीच संघर्ष करावा लागत होता. सध्या विद्यापीठात अभाविप आणि एसआयएफ मध्ये तणावाचे वातावरण आहे. आता मुख्यमंत्र्यांचे भाऊ निवडणुकीत उतरले तर अभाविप चे पारडे नक्कीच जड होईल.

सध्या विद्यापीठ विकास मंच विद्यापीठात सक्रीय आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच विद्यार्थी परिषदेच्या व्दारे तयार झालेले प्राध्यापक या मंचाचे नेतृत्व करतात. त्यामुळे प्रसेनजीत हे राजकारणात नवीन असले तरी मार्गदर्शकांचा दांडगा अनुभव त्यांचा सोबत आहे.

कोण आहेत प्रसेनजीत फडणवीस ?
प्रसेनजीत हे पुण्यात अभाविप चे कार्यकर्ते आहेत. त्यांचे वडील पुण्यात स्थाईक असल्याने प्रसेनजीत पुणेकर आहेत. प्रसेनजीत यांनी पुण्याच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून संगणकशास्त्रातून पदवी घेतली आहे. तसेच त्यानंतर “एलएलबी’ देखील केले आहे. मात्र विद्यापीठाच्या राजकारणात ते यापूर्वी कधीच सक्रिय नव्हते. आता मुख्यमंत्र्याचेच पाठबळ असल्याने त्यांच्या तयारीसाठी सर्व कार्यकर्ते जोमाने तयारीला लागले आहेत.