आघाडीत स्वाभिमानीला केवळ एक जागा, आग्रही जागा बुलढाण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी 12 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे, यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेला हातकणंगलेची जागा सोडण्यात आली आहे. संघटनेकडून आग्रह धरण्यात आलेल्या बुलढाणा लोकसभेसाठी मात्र राष्ट्रवादीने स्वतःचा उमेदवार दिला आहे.

आघाडीत सहभागी होण्यासाठी खा राजू शेट्टी यांनी हातकणंगले, बुलढाणा आणि वर्धा मतदारसंघाची मागणी केली आहे. यामध्ये आज राष्ट्रवादीने हातकणंगलेची जागा शेट्टी यांच्यासाठी सोडण्यात येत असल्याचे सांगितले आहे. मात्र बुलढाण्याच्या जागेवर राजेंद्र शिंगणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

दरम्यान, स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांच्यासाठी मागण्यात आलेली बुलढाणा लोकसभा संघटनेला मिळण्याची शक्यता मावळली आहे. त्यामुळे राजू शेट्टी हे आता काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.