आई किंवा मुलाचीच अध्यक्षपदी निवड होईल; अय्यर यांची कॉंग्रेसवर जाहीर टीका

मणीशंकर अय्यर यांनी उपस्थित केलं राहुल गांधींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह

टीम महाराष्ट्र देशा: काँग्रेसच्या अध्यक्षपदी केवळ दोनच व्यक्ती विराजमान होऊ शकतात. आई किंवा मुलाचीच पक्षाच्या अध्यक्षपदी निवड होऊ शकते, असे विधान काँग्रेसचे वरिष्ठ नेते मणीशंकर अय्यर यांनी केले आहे. काँग्रेसमध्ये घराणेशाही असल्याचे शाब्दिक हल्ले भाजपकडून केले जात असतानाच अय्यर यांनी हे विधान केले आहे. त्यामुळे आता ‘घराणेशाही’च्या मुद्यावरुन काँग्रेसवर होणाऱ्या टीकेचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.

राहुल गांधींची दिवाळीनंतर काँग्रेसच्या अध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर अय्यर यांनी हे वक्तव्य केलं. काही दिवसांपूर्वीच काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी याबाबत संकेत दिले होते. याबद्दल प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी मणीशंकर अय्यर यांना प्रश्न विचारला  होता या प्रश्नाला उत्तर देताना,आमच्यात फक्त आई किंवा मुलगाच अध्यक्ष होऊ शकतात, असं म्हणत अय्यर यांनी थेट गांधी परिवारावरच निशाणा साधला. शिवाय काँग्रेसमधील अंतर्गत लोकशाहीच्या राहुल गांधींच्या दाव्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे.

काय म्हणाले मणिशंकर अय्यर ?
‘’काँग्रेसचे पुढील अध्यक्ष दोन जण असू शकतात. एक मुलगा, किंवा दुसरी आई. कारण आपण निवडणूक लढायला तयार असल्याचं राहुल गांधींनी सांगितलं. मात्र त्यासाठी विरोधकाची गरज असते. एखादा विरोधक मिळाला तर चांगली गोष्ट आहे. निवडणूक होईल. विरोधकच नसल्यास निवडणूक कशी होईल’’, असा सवाल मणिशंकर अय्यर यांनी केला. हिमाचल प्रदेशातील सोलनमध्ये ते बोलत होते. अय्यर यांच्या या विधानामुळे ‘घराणेशाही’च्या मुद्यावरुन भाजपकडून काँग्रेसवर जोरदार टीका होण्याची शक्यता आहे.

 

You might also like
Comments
Loading...