fbpx

साहेब माझ्या जिल्ह्याला बाकी काही नको, फक्त आमच्या हक्काचं पाणी द्या : ओमराजे निंबाळकर

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभेमध्ये मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात अर्थसंकल्पाबाबत चर्चा केली जात आहे. या चर्चेवेळी उस्मानाबादचे खा. ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या जिल्ह्याच्या हक्काच्या पाण्याचा मुद्दा पोट तिडकीने मांडला आहे. तसेच ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या मातृभाषेत ही मागणी केली आहे.

यावेळी ओमराजे यांनी पंतप्रधान मोदींच्या भाषणाची आठवण करून देत पाणी प्रश्न सभागृहासमोर मांडला. ओमराजे म्हणाले की, आम्हाला कुठलंही पॅकेज नको, आम्हाला कुठलीही आर्थिक मदत नको. आम्हाला कर्जमुक्तीही नको. पण, माझ्या मराठवाड्याला आमच्या हक्काचं 21 टीएमसी पाणी हव आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने पाण्याच्या बाबतीत आमच्यावर अन्याय केला आहे, असा आरोप देखील त्यांनी केला. तसेच यावेळी ओमराजे यांनी मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येची व्यथा सांगितली. केवळ, पाणी नसल्यानं शेती पिकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर, मतदारसंघातील नागरिकांवर हा निर्णय घेण्याची वेळ येत आहे, असे ते म्हणाले.

दरम्यान लोकसभा निवडणुकीत उस्मानाबाद मतदारसंघातून ओमराजे निंबाळकर यांनी घवघवीत यश मिळवत लोकसभेत धडक मारली आहे. भाजप सेनायुतीकडून ओमराजे निंबाळकर यांनी निवडणुकीत सहभाग घेतला होता. यावरून ओमराजे म्हणाले की, मोदींच्या शब्दांवर विश्वास ठेऊन लोकांनी मला विजयी केलं आहे. कारण, मोदींनी दिलेला शब्द ते पूर्ण करतील, अशी अपेक्षा या लोकांना आहे. त्यामुळे आमच्या मराठवाड्याला हक्काचं पाणी द्याव.