पाकिस्तानमधून केवळ 1908 मेट्रिक टन साखरेची आयात

नवी दिल्ली : पाकिस्तानातून साखर आयातीबाबत प्रसार माध्यमातून देण्यात आलेली माहिती चुकीची असून चालू आर्थिक वर्षात पाकिस्तानातून केवळ 1908 मेट्रिक टन साखरेची आयात करण्यात आल्याचे केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. पाकिस्तानातून केल्या जाणाऱ्या साखर आयातीबाबत काही प्रसारमाध्यमांमध्ये चुकीची माहिती प्रसिद्ध झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाकडून आज यासंदर्भात खुलासा करण्यात आला.

चालू आर्थिक वर्षात 14 मे 2018 पर्यंत पाकिस्तानातून केवळ 1908 मेट्रिक टन साखरेची आयात करण्यात आली असून त्याची किंमत 0.657 दशलक्ष अमेरिकन डॉलर असल्याचे मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले. तुलनेने 2017-18 यावर्षात पाकिस्तानातून 13 हजार 110 मेट्रिक टन साखर आयात करण्यात आली होती व त्याची किंमत 4.68 दशलक्षअमेरिकन डॉलर होती.

भारतात प्रामुख्याने ब्राझील कडून साखरेची आयात केली जाते. 2017-18 च्या गळीत हंगामात देशात साखरेचे उत्पादन 31.90 मेट्रिक टन झाले. या वर्षभरातच देशातून 1.75 दशलक्ष टन साखरेची निर्यातही झाली. एप्रिल-मे 2018 या दोनच महिन्यात साखरेची एकूण निर्यात 240.093 मे.ट. इतकी होती. म्हणजेच भारतातील साखरेचे एकूण उत्पादन व निर्यात यांच्या तुलनेत पाकिस्तानातून होणारी आयात अत्यल्प असल्याचे स्पष्ट होते.

पाकिस्तान सरकारने त्यांच्या निर्यात साखरेवर प्रती किलो 10.7 रूपयांचे अंशदान (सबसिडी) दिल्याचेही वाणिज्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. सध्या भारतात साखरेवर 100 टक्के सीमा शुल्क असून साखरेची आयात मोफत होते. भारतात आयात होणाऱ्या कोणत्याही मालावर पाकिस्तानबाबत विशिष्ट निर्बंध घालण्यात आले नसल्याचे वाणिज्य मंत्रालयाने स्पष्ट केले.