fbpx

Pune: गोधडीचा ऑनलाईन बिझनेस,पुण्यातील मैत्रिणींच्या कमाल

पुणे : टाकाऊतून टिकाऊची चर्चा कायम इको-फ्रेंडली म्हणून होत असली, तरी महाराष्ट्राच्या घरा-घरांमध्ये टाकाऊतून टिकाऊ आणि फक्त टिकाऊच नाही तर उबदार गोधडी अगदी शेकडो वर्ष शिवली जाते आहे. पण फेसबुकसारख्या आधुनिक माध्यमाचा वापर करुन गोधडीला आंतरराष्ट्रीय मार्केट मिळालंय, असं सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल ना? पण पुण्याच्या अर्चना जगताप आणि ऋचा कुलकर्णी या दोघींनी हे शक्य करुन दाखवलं आहे.

पुण्याच्या कोंढवा बुद्रुक या शहराजवळ पण तरी आपलं गावपण जपलेल्या गावात महिलांसाठी काय करता येईल याचा विचार करताना अर्चना आणि ऋचा या मैत्रिणींना गोधडीची कल्पना क्लिक झाली. गोधडी ही खरं तर आपल्या घरा-घरात शिवली जाते. कोंढव्यात ही अनेक महिलांच्या रोजच्या आयुष्याचा भाग असलेली गोधडीच त्यांना आर्थिक दृष्ट्या सबल करु शकेल असा विचार करत अर्चना आणि ऋचा कामाला लागल्या.

घरोघरी तयार होणारी गोधडी विक्रीसाठी तयार करायची असेल, तर तिचा दर्जा काय हवा, रंग-डिझाईन-पोत काय हवा असा बराच विचार करण्यात आला. मग त्यावर काम करण्यात आलं. महिलांना प्रशिक्षण ही दिलं गेलं आणि त्यातून उभा राहिला क्विल्ट कल्चर हा छोटा ग्रुप.

तयार झालेल्या काही गोधड्या बाजारात विकायला पाठवायच्या तर व्यापाऱ्यांना कमिशन देणं आलं आणि म्हणून त्यापेक्षा विनाखर्चिक असलेला फेसबुक पेजचा पर्याय स्वीकारला गेला. फेसबुक पेजनं तर जणू काही कमाल केली. अनिवासी भारतीय आणि गोधडीच्या युनिकनेसनं भारावलेले अनेक फॉरेनर्ससुद्धा गोधडी म्हणजेच क्विल्टच्या प्रेमात पडले.

आपल्या घरात वर्षानुवर्षे गोधडी बघितलेली असल्यामुळे तिच्या सांस्कृतिक महत्त्वाचा विचारच न केल्याचं ऋचा म्हणते आणि गोधडीशी तुटलेल्या अनेकांना एकत्र जोडायला आधी स्वतः तिच्याशी कनेक्ट झाल्याचीही कबुली ती देते.

विशेष म्हणजे आता न्यूझिलंड, स्पेन, लंडन, अमेरिका अशा अनेक देशांत क्विल्ट पोचली आहे. क्विल्ट पाठोपाठ क्विल्टच्याच रुपानं नटलेल्या बॅग्ज, पर्सेस, लॅपटॉप स्लिव्ह्ज अशाही गोष्टी आता क्विल्ट कल्चर तयार करते.

बाजारातली प्रचंड स्पर्धा, पदोपदी द्यावी लागणारी कमिशन्स यांचा विचार करता गोधडीत जीव ओतणाऱ्या महिलांना आर्थिक फायदा नव्हता. पण फेसबुकवरुन विनामूल्य मार्केटिंग झालं आणि कष्टकरी महिलांना पैसे मिळाले आणि त्यांना चार चांगले दिवस आले.

फेसबुक, व्हॉट्सअॅप, इंटरनेट हा आपल्या आयुष्याचा खरं तर अविभाज्य भाग झाला आहे. पण या सगळ्या माध्यमांचा वापर केला तर आपल्या संस्कृती आणि परंपरेचा भाग असलेल्या, शहरी आयुष्यात थोड्या मागे पडत चाललेल्या वस्तू नुसत्याच पुढे येत नाहीत, तर साता-समुद्रापार ही जातात हे अर्चना आणि ऋचाच्या क्विल्ट कल्चरनं सिद्ध केलं आहे.

सौजन्य- एबीपी माझा, पुणे