दहावी, बारावीच्या फॉर्म १७ साठीही आता ऑनलाइन प्रक्रिया

पुणे : राज्य शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी – मार्च २०१८ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना खासगीरीत्या फॉर्म क्रमांक १७ भरून परीक्षेस प्रविष्ट होण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी येथे दिली.

मात्र, या विद्यार्थ्यांचे नावनोंदणी अर्ज या वर्षीपासून ऑनलाइन प्रक्रियेद्वाराच स्वीकारले जाणार आहेत. त्यासाठी फॉर्म भरण्याच्या अंतिम तारखेला मुदतवाढ देण्यात आली आहे. आता विद्यार्थी १५ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन फॉर्म भरू शकतील, असे म्हमाणे यांनी स्पष्ट केले.

दरवर्षी हजारो विद्यार्थी दहावी आणि बारावीच्या परीक्षेस खासगीरीत्या प्रविष्ट होतात. आजवर या विद्यार्थ्यांनी नोंदणी ऑफलाइन पद्धतीने फॉर्म १७ भरून (मॅन्युअली) केली जात होती. मात्र नव्या शैक्षणिक वर्षापासून फॉर्म १७ भरण्याची व खासगीरीत्या परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी सर्व प्रक्रिया ऑनलाइन होणार असल्याचे म्हमाणे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रक्रिया करणे सोयीचे जावे यासाठी फॉर्म भरण्याला १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

अशी करा प्रक्रियाऑनलाइन अर्ज भरताना इयत्ता दहावीसाठी http//form17.mh-ssc.ac in या, तर इयत्ता बारावीसाठी http//form 17.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावर सर्व माहिती देण्यात आली आहे. सर्व सूचना मराठी आणि इंग्रजीत उपलब्ध आहेत. दहावीसाठी नावनोंदणी शुल्क ११०० रुपये, तर इयत्ता बारावीसाठी ६०० रुपये आहे. हे शुल्क मात्र रोख स्वरूपात शाळा वा कनिष्ठ महाविद्यालयात जमा करायचे आहे. यंदापासून माहिती पुस्तिकांची छपाई बंद केली असून माहितीपुस्तिका संकेतस्थळावरच उपलब्ध केल्यात.