उच्चशिक्षित तरुणांची सराईत गुन्हेगाराकडून फसवणूक

पुणे : संकेतस्थळावर हॉटेलमध्ये नोकरीची जाहिरात देऊन दोन उच्च शिक्षित तरुणांची एका सराईत गुन्हेगाराने 60 हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना चिंचवड येथे उघडकीस आली. दिपेश सोनी (रा. पिंपरी), असे फसवणूक करणा-या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्यावर भोसरीसह चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.

सध्या आरोपी सोनी हा चतुःश्रृंगी पोलिसांच्या कोठडीत आहे. याप्रकरणी नदिन गंवडी (वय-25, रा. कर्वेनगर) याने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 6 ते 26 सप्टेंबर 2017 या कालावधीत घडला. फौजदार आर. बी. सोडनवर यांनी माहिती दिली. फिर्यादी गवंडी हा बीई इलेक्ट्रॉनिक्सचे शिक्षण घेत आहे. तो व त्याचा मित्र अभिजीत बाबासाहेब पाटील पार्टटाईम नोकरीच्या शोधात होते. लिंक इन या संकेतस्थळावर चिंचवड येथील रिव्हर व्ह्यू हॉटेलमध्ये नोकरी लावण्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.

ही जाहिरात पाहून फिर्यादी व त्याच्या मित्राने आरोपी सोनीशी संपर्क साधला. नोकरी लावण्याचे आमिष दाखवून सोनीने दोघांकडून प्रत्येकी 30 हजार असे 60 हजार रुपये घेतले. नोकरी न लावताच त्यांची फसवणूक केली. चिंचवड पोलीस अधिक तपास करत आहेत