फेसबुकवरील मैत्रीद्वारे महिलेची अज्ञात तरुणाकडून फसवणूक

मुंबई : जे. जे. मार्ग परिसरातील सुमैय्या मोमिन या महिलेची फेसबुकवरून झालेल्या मैत्रीतून फसवणुक झाल्याची घटना घडली आहे. फेसबुकमुळे ओळख झालेल्या अज्ञात तरुणाने सुमैय्या यांना साडेचार लाख रुपयांचा गंडा घातला आहे.

अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात राहत असल्याचा दावा करणाऱ्या मॅक्स जोहान्स नावाच्या व्यक्तीशी सुमैय्या यांची दोन महिन्यांपूर्वी फेसबुकवर मैत्री झाली. ही मैत्री हळूहळू वाढत गेली, त्यातून त्यांचे सभाषण वाढले. अशाच एका संभाषणात मॅक्सने भावनावश झाल्याचे नाटक केले.

आपल्या पत्नीचे कर्करोगाने निधन झाल्याने भारतातील कर्करोग पीडितांसाठी मदत करण्याची इच्छा त्याने तिच्या समोर व्यक्त केली. यासाठी मला मदत अशी विनंती करत त्याने तिच्याकडून साडेचार लाख रुपये उकळले. याप्रकरणी जे. जे. मार्ग पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली असून तपासात दिल्लीतील काही खात्यांत साडेचार लाख रुपयांची रक्कम जमा झाल्याचे उघड झाले.