कोरोना इफेक्ट : कांदा पुन्हा गाठणार शंभरी ?

लासलगाव : किरकोळ बाजारातील कांद्याची आवक पुन्हा एकदा घटणार आहे. त्यामुळे कांद्याचा भाव शंभरी पार जाऊन पुन्हा एकदा सामन्यांच्या डोळ्याला पाणी आणणार असल्याचं दिसत आहे. कोरोनाचा परिणाम कांद्याच्या लिलावावरही झाला असून राज्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील सर्वच कांद्याच्या बाजारपेठेतील लिलाव अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा परिणाम आज कांद्याच्या लिलावरही दिसून आला. कोरोनाच्या भीतीने बाजार समितीत हमाल आणि इतर कामगारांनी कामावर येण्यास नकार दिला आहे. त्यामुळे लासलगाव बाजार समितीच्या बैठकीत व्यापाऱ्यांनी अनिश्चित काळासाठी लिलावात सहभागी होणार नसल्याचे पत्र जाहीर केले आहे.

दरम्यान अवकाळी पावसाच्या काळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे चांगलेच नुकसान झाले होते. मात्र त्यावेळी आवक घटल्याने कांद्याचा भाव चांगलाच वाढला होता. त्यानंतर शेतकऱ्याच्या शेतातील कांदा बाजारात आल्याने कांद्याच्या आवकेत लक्षणीय वाढ झाली व भाव देखील चांगलेच गडगडले.

मधल्या काळात शेतकऱ्यांनी आंदोलने केल्यानंतर केंद्र सरकारने कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी कांद्याची निर्यात खुली केली. मात्र आता कोरोनाच्या संकटामुळे या निर्यातीलाही खीळ बसली.