कांद्याने खाल्ला भाव: पारनेरमध्ये कांद्याला ६४०० रुपये प्रति क्विंटलचा दर!

onian

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- कांदा निर्यात बंद असली तरी सध्या कांद्याचा देशात तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे कांद्याचे दर वाढले आहेत. दक्षिणेकडील राज्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे कांद्याचे नुकसान झाले आहे. देशातही कांद्याला मागणी वाढल्याने बाजार भाव वाढताना दिसत आहेत.

पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्यास उच्चांकी बाजारभाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. शुक्रवारी झालेल्या कांदा लिलावामध्ये प्रथम क्रमांकाचा कांदा भाव खावून गेला. या वर्षीच्या हंगामातील हा पारनेर बाजार समितीमधील उच्चांकी बाजार भाव आहे. सोशल मीडियातही याची चर्चा सुरू आहे. काहीजण तर इतका भाव मिळाल्यावर शेतकऱ्याची पोरं कशाला शहरात जातील, अशी भावनिक टिपणी करत आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीत २ हजार १४८ कांदा गोण्यांची आवक झाली. तर प्रथम क्रमांकाच्या कांद्याला ६ हजार ४०० रूपये प्रती क्विंंटलचा दर मिळाला. तर दुसऱ्या क्रमांकाच्या कांद्यास ५ हजार ५०० तर त्या खालोखाल ३ हजार ४०० ते २ हजार ५०० रूपयांपर्यंत बाजारभाव मिळाला.

या हंगामातील हा बाजार भाव उच्चांकी असल्याने आता बाजार वाढणार आहेत, या आशेने शेतकरी समाधानी झाले आहेत. सध्या तालुक्यात वारेमाप पाऊस झाल्याने अनेकांचे कांदा पीक वाया गेले आहे. कांदा रोपेही खराब झाल्याने कांदा लागवडही करता आली नाही. तसेच आता काही ठराविक शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक आहे. आता कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असल्याने ज्यांच्याकडे कांदा आहे, त्यांना आनंद झाला आहे.

कांदा निर्यात बंद असली तरी देशातही कांद्याला मागणी वाढल्याने बाजार भाव वाढताना दिसत आहेत. यावर्षी अनेक राज्यातील कांदा पीक अती पावसामुळे वाया गेले आहे. त्यामुळे कांद्याचे उत्पादन घटले आहे. परिणामी आगामी काळात ही कांद्याचे दर वाढण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या-