मुलीची छेड काढणा-याला एक वर्ष सक्‍त मजुरी

औरंगाबाद : दहावीतील मुलीची छेड काढत विनयभंग करणा-या आरोपीला एक वर्ष सक्तमजुरी व सहा हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. एस. शिंदे यांनी बुधवारी ठोठाविली.

पैठण येथील १५ वर्षीय मुलगी १० जून २०१४ रोजी सकाळी साडेअकराला कामानिमित्त जात असताना आरोपी रवींद्र विश्वनाथ पाटेकर (वय २४) याने तिला रस्त्यात अडवून अश्‍लील वर्तन केले. त्यानंतर पुन्हा गावातील सार्वजनिक कार्यक्रमात छेड काढत तिचा विनयभंग केला.

या प्रकरणी तक्रारीनंतर बालानगर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध कलम ३५४ (अ), (ड) व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या (पोक्सो) कलम ११ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास करून आरोपी विरोधात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्यावेळी सहायक लोकअभियोक्ता अनिल हिवराळे यांनी सात साक्षीदारांचे जबाब नोंदविले. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर आरोपीला ‘पोक्सो’च्या कलम ११, १२ अन्वये एक वर्ष सक्तमजुरी व तीन हजार रुपय दंड, तर कलम ३५४ (ड) अन्वये एक वर्ष सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिन्यांच्या कारवासाची शिक्षा ठोठावली.