fbpx

राहुल गांधीचा कॉंग्रेस अध्यक्षपदाचा एक वर्षाचा कार्यकाल, कॉंग्रेस साठी किती फायदेशीर ?

टीम महाराष्ट्र देशा– कॉंग्रेस अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारून राहुल गांधी यांना एक वर्ष पूर्ण होत आहे. अध्यक्षपदाच्या आपल्या वर्षभराच्या कार्यकालात राहुल यांनी त्यांच्यात बराच बदल करण्याचा प्रयत्न केला. नुकत्याच झालेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत तीन राज्यात कॉंग्रेसला सत्ता स्थापन करण्यात यश आलं आहे. पण त्यानंतरही सामान्य लोकांचा विश्वास संपादन करण्यात त्यांना किती यश आलं हे मात्र अजून नक्की सांगता येणार नाही.

१६ डिसेंबर २०१७ रोजी राहुल गांधी यांनी कॉंग्रेस अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारला. आज त्याला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्याआधीही बराच काळ राहुल गांधी अध्यक्ष होणार अशी चर्चा होत होती. अध्यक्षपद स्वीकारण्यापूर्वी लोकसभा निवडणुकीतील आणि त्यानंतरच्या इतर राज्यातील विधानसभा निवडणुकीतील सलग पराभव कॉंग्रेस पक्षाला सहन करावे लागले होते. कॉंग्रेस पक्षाच्या सततच्या पराभवामुळेच राहुल गांधी अध्यक्षपद स्वीकारत नाहीत अशीही चर्चा होती. अखेर मागच्या वर्षी त्यांनी कॉंग्रेस अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली. नेहरू-गांधी घराण्यातील ते सहावे कॉंग्रेस अध्यक्ष ठरले आहेत.

गेल्या वर्षभरात राहुल गांधी यांनी सातत्त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारच्या कामकाजावर लक्ष्य करण्याची एकही संधी सोडली नाही. त्याआधी मात्र राहुल गांधी विस्कळीत टीका करायचे. गेल्या वर्षभरात परराष्ट्र धोरण , आर्थिक धोरणे, भ्रष्टाचार, जातीयवाद यावरून भाजपवर सातत्याने टीका केली. राहुल गांधी यांच्यात आधी एक प्रकारे विस्कळीतपणा असायचा. पण गेल्या वर्षभरात त्याच्यात बरीच सुधारणा झाल्याचे दिसून येते.

राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदाच्या काळात, मागच्या वर्षात एकूण नऊ राज्यांत विधानसभा निवडणुका झाल्या. यापैकी कर्नाटक, मिझोराम आणि मेघालयाची सत्ता पक्षाला गमवावी लागली. आताच झालेल्या मिझोराममधील पराभवामुळे ईशान्येकडे एकाही राज्यात काँग्रेस आता सत्तेत राहिलेला नाही. तर कर्नाटकात भाजपला सत्तेपासून रोखण्याकरिता कॉंग्रेसने जनता दलाला पाठिंबा दिला. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यात सत्ता मिळाल्याने नक्कीच काँग्रेसचा आत्मविश्वास बळावला आहे. पण यानंतर आता राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची खरी कसोटी २०१९च्या लोकसभा निवडणुकीत लागणार आहे, असं म्हणता येईल.

२०१४च्या निवडणुकीतही मोदी विरुद्ध राहुल गांधी अशीच लढत झाली होती. यात राहुल गांधीना जबरदस्त हार स्वीकारावी लागली आहे. यावेळी पुन्हा २०१९ मध्ये पुन्हा मोदी विरुद्ध राहुल अशीच लढत होणार आहे. लोकसभेची सेमीफायनल समजली जाणाऱ्या या विधानसभा निवडणुकात राहुल गांधी यांचा वरचष्मा राहिला आहे. पण फायनल बाकी आहे आणि राहुल गांधी यांचा खरा कस तिथेच लागणार आहे.