अक्कलकोट येथील उद्योजकास वीजचोरीप्रकरणी एक वर्षाची कैद व 2 लाखांचा दंड

मुंबई : वीजचोरीप्रकरणी अक्कलकोट (जि. सोलापूर) येथील उद्योजक रवींद्र मोहन भंडारे यास एक वर्षाची कैद आणि दोन लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. सोलापूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने नुकताच हा निकाल दिला.

याबाबत माहिती अशी, अक्कलकोट एमआयडीसीमधील रवींद्र भंडारे या वीजग्राहकाच्या कारखान्याची महावितरणच्या फिरत्या पथकाने एप्रिल 2014 मध्ये तपासणी केली होती. यामध्ये वीजमीटरचे सील तोडून त्यात फेरफार केल्याचे दिसून आले. तसेच मीटरची गती 68.02 टक्के संथ केल्याचेही चाचणी अहवालातून स्पष्ट झाले. त्यानुसार एकूण 46,860 रुपयांची वीजचोरी केल्याप्रकरणी पोलीसांनी विद्युत कायदा 2003 चे कलम 135 अन्वये वीजग्राहक भंडारेविरुद्ध गुन्हा दाखल करून प्रकरण न्यायप्रवीष्ट केले. दरम्यान या वीजग्राहकाने वीजचोरीच्या देयकाचे 46,860 रुपयांचा भरणा केला. मात्र 20 एचपीप्रमाणे तडजोडीसाठी आकारलेल्या 2 लाख रुपयांची रक्कम संधी देऊनही भरली नाही.

सोलापूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीमध्ये वीजचोरीप्रकरणी रवींद्र भंडारे दोषी असल्याचे सिद्ध झाले व त्यास न्यायालयाने एक वर्षाची साधी कैद तसेच 2 लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. न्यायालयात सरकारी पक्षाकडून अॅड. प्रेमलता व्यास यांनी बाजू मांडली.